
कल्याण (वार्ताहर) : महिला सबलीकरणासाठी होपमिरर फाऊंडेशनने ‘प्रोजेक्ट सखी’ हा उपक्रम सुरू केला असून महिला व्यापार योजनेद्वारे महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. होपमिरर फाऊंडेशनने आदिवासी समाजाच्या विकासासाठी आदिवासी विकास प्रकल्प सुरू केला आहे. होपमिररने खारघर शहराजवळ असलेल्या दोन आदिवासी वाडी घोलवाडी आणि आंबावाडी येथे सर्वेक्षण केले.
सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले की, महिला वर्ग बेरोजगार आहे. यासाठी ‘प्रोजेक्ट सखी’ महिला व्यापार योजना हा प्रकल्प गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केला आहे. ज्यामध्ये अगरबत्ती बनवायच्या मशीनद्वारे महिलांना पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना कमावण्याची आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची संधी मिळेल. या महिलांनी बनविलेले उत्पादन बाजारामध्ये ‘सखी अगरबत्ती’ नावाने उपलब्ध आहे.
सध्या आम्ही दोन आदिवासी गरजू महिलांना रोजगार दिला आहे. पुढे जसजसा प्रतिसाद मिळेल त्यानुसार आम्ही आणखी महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करू, असे होपमिरर फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष रमझान शेख यांनी सांगितले.