Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडी‘मातोश्री’नंतर आता 'केबलमॅन' आणि 'एम ताई' कोण?

‘मातोश्री’नंतर आता ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ कोण?

यशवंत जाधवांच्या डायरीत आढळलेल्या आणखी २ नावांच्या खुलाशाने शिवसेनेत खळबळ

मुंबई : मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीमुळे अनेकांचा भांडाफोड होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने जाधव यांच्या घरी धाड टाकली होती तेव्हा त्यांच्या घरात एक डायरी सापडली होती. या डायरीतून विविध खुलासा समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’चा उल्लेख आढळला होता. तेव्हा भाजपाने थेट शिवसेनेवर निशाणा साधला होता.

आता आयकर विभागाच्या तपासातून आणखी एक माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. जाधव यांच्या डायरीत आणखी २ नावांचा खुलासा झाला आहे. ज्यांना कोट्यवधीची रक्कम देण्यात आली आहे. डायरीत ‘मातोश्री’नंतर आता केबलमॅन, एम ताई या नावाचा उल्लेख आढळला आहे. त्यातील ‘केबलमॅन’ हे एका मंत्रिपदाशी संबंधित आहेत तर दुसरं नाव ‘एम ताई’ हे मुंबई महापालिकेतील सक्रीय असणाऱ्याचे आहे, असा दावा केला जात आहे, अशी बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

आयकर विभागाला मिळालेल्या छापेमारीत एक डायरी आढळली होती. मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचे म्हटले होते. आता ‘त्या’ डायरीत केबलमॅनला १ कोटी २५ लाख रुपये तर एम ताईला ५० लाख रुपये दिल्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ती दोन नावे कोणाची? याचा तपास आयकर विभाग करतंय. यशवंत जाधव यांनी ज्यांना पैसे दिलेत त्यांची नावं डायरीत लिहिल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे एवढे पैसे यशवंत जाधव यांनी कुणाला दिले? याचा शोध घेतला जात आहे. ही २ नावं समोर येताच आयकर विभागाकडून त्यांनाही समन्स पाठवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने (एमसीए) सोमवारी मुंबई पोलिसांना पत्र लिहून जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी लेखी तक्रार दिली आहे. हे पत्र ४ एप्रिलला मरिन ड्राईव्ह पोलिसांना देण्यात आले आहे. कॉर्पोरेट कंपनी मंत्रालयाच्या (एमसीए) अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रानुसार, प्रधान डीलर्ससह सहा कंपन्यांविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ४२०, १२० (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची तक्रार केली आहे. या तक्रारीत जाधव यांचे नाव नसले तरीही या सगळ्या कंपन्या जाधव यांच्याशी संबंधित असल्याचे एमसीएने म्हटले आहे. जाधव यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासामध्ये या कंपनीने केलेले गैरव्यवहार समोर आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -