
प्रशांत जोशी
डोंबिवली : मागील ४० वर्षांपासून शहरात १३६ ग्रंथालय वाचकांसाठी सुरू होत्या. मात्र बदलत्या काळात आता फक्त एकमेव पै फ्रेंड्स लायब्ररी वाचकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. लायब्ररीच्या माध्यमातून मुंबई, पुणे इतकेच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि स्पेनपर्यंत पुस्तकांचा प्रवास होतो. विशेष म्हणजे २०२० पासून ते २०२२ या दोन वर्षांच्या कोरोना टाळेबंदीत टीव्ही, मोबाइलमध्ये गुंतलेली तरुणपिढी पै फ्रेंड्स लायब्ररीच्या पुस्तकांत रमली होती. याविषयी पै फ्रेंड्स लायब्ररीची माहिती डोंबिवली पत्रकार संघाच्या चर्चासत्रात पै यांनी विशद केली.
यावेळी पुंडलीक पै, भूषण पत्की आणि सुरेखा पुरोहित उपस्थित होते. दरम्यान पुंडलिक पै म्हणाले, लायब्ररीच्या ६ शाखा असून २५ हजारांहून अधिक पुस्तके, ग्रंथ, मासिक, नियतकालिक वाचकांसाठी उपलब्ध आहेत. ऑनलाइन पद्धतीने वाचकांना पुस्तकांचा लाभ देण्याचा उपक्रम सुरू आहे. पुस्तक आदान-प्रदान आणि प्रदर्शन २०१७ साली आगळीवेगळी कल्पना अमलात आणताना ७० हजार पुस्तके जमा झाली. सुमारे १० हजार वाचकांनी यात सहभाग घेतला घेतला.
२५ हजार पुस्तके, इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील विविध मासिकांचे संकलन, पुस्तकांची घरपोच सेवा, विविध पुस्तकांचे अद्ययावत विक्री दालन, २४/७ सेवा देणारे दोन वाचन सभागृह हे पै फ्रेंड्स लायब्ररीची खास वैशिष्ट्य आहे.
फ्रेडस कट्टा हा पै फ्रेंड्स लायब्ररीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. २००८ साली लायब्ररीतर्फे ऑनलाइन सेवा सुरू केली असल्याचे पुंडलिक पै यांनी सांगितले.