देवा पेरवी
पेण : ‘स्वररंग’ तर्फे पेण नगर परिषदेच्या भव्य मैदानावर भरलेल्या पेण फेस्टिव्हलमध्ये रविवारी झालेल्या ‘मिस रायगड’ स्पर्धेत कल्याणची वृषाली मालावडेकर ही ‘मिस रायगड’ची अंतिम विजेती ठरली, तर नवी मुंबईच्या सानिया सिंग हिने या स्पर्धेतील फस्ट रनरअपचे, तर मुरुड मिठेखारच्या हिमानी गायकर हिने सेकंड रनरअपचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेतील बेस्ट कॅटवॉक नेहा पाटील (पेण), बेस्ट स्माईलचे स्वप्नाली कळमकर (पाली), बेस्ट हेअरचे कल्याणी पाटील (पेण), बेस्ट फोटोजनीकचे धारा विसारिया (डोंबिवली), बेस्ट पर्सनालिटीचे राणी जैसवाल (कामोठे), बेस्ट कॉश्मूमचे अंजली गायकवाड (मुंबई) या स्पर्धकांनी पारितोषिके जिंकली. या स्पर्धेत एकूण २१ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. सर्वांनीच आपल्या मनमोहक अदा सादर करून रसिकांना मोहित केले. या स्पर्धेसाठी रसिकांनी विशेषतः युवा वर्गानी मोठी उपस्थिती दर्शविल्याने स्टेज सामोरील प्रांगण खचाखच भरले होते.
विजेत्यांना स्वररंगचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी, कोकणातील प्रसिद्ध उद्योजक शामकांत खातू, भाजप युवा नेते वैकुंठ पाटील, उद्योजक यशवंत घासे, राजू पिचिका, प्रकाश झावरे, शर्मिला पाटील, खजिनदार भारती साळवी, स्वररंग उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, सारिका पाटील, अनिकेत साळवी, आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
इन्ट्रोड्यूस राऊंड, साडी राऊंड, वेस्टन राऊंड व ईव्हीनिंग गाऊन राऊंड अशा चार राऊंडमध्ये सादर करण्यात आलेल्या या स्पर्धेची कोरिओग्राफी रूपेश चव्हाण (मुंबई) व त्यांचे सहायक कोरिओग्राफर निखिल बाचल यांनी साकारली, तर लोकशाही न्यूज चॅनलचे अँकर ऋषी देसाई यांच्या उत्कृष्ट समालोचनाची साथ या स्पर्धेला लाभली. परीक्षक म्हणून सिने अभिनेत्री श्रद्धा पोतदार, डॉ. वैभव ठाकूर, प्रवीण पवार, सेजल सावंत व रायगड शो टॉपर प्रो.अक्षता साळवी यांनी काम पाहिले. यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य मंगेश नेने, दिलीप बापट, समीर साने, प्रशांत ओक व सुधीर जोशी यांचा सत्कार करण्यात आला.