मुंबई : मुंबईत एक्सई तसेच कापा व्हेरिएंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या बातमीने मुंबईसह देशाचीही चिंता वाढली आहे.
मुंबईत एक्सई आणि कापा व्हेरिएंटचा एकेक रुग्ण आढळला आहे. देशातील एक्सई व्हेरिएंटचा हा पहिलाच रुग्ण ठरला आहे. जीनोम सीक्वेन्सिंग केले असता हे रुग्ण आढळले आहेत. जीनोम सीक्वेन्सिंगसाठी ३७६ नमुने घेण्यात आले होते. त्यातील २३० नमुने मुंबईतून घेतले गेले होते. या चाचणीची ही अकरावी खेप होती. यात २३० पैकी २२८ नमुन्यांत ओमायक्रॉनची लक्षणे, एकात कापा व्हेरिएंटची लक्षणे तर एकात एक्सई व्हेरिएंटची लक्षणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाचा एक्सई हा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट बीए.२ च्या तुलनेत १० टक्के जास्त वेगाने फैलावतो, असे प्राथमिक अभ्यासात आढळले आहे. ब्रिटनमध्ये या व्हेरिएंटचे आतापर्यंत सहाशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पहिला रुग्ण १९ जानेवारी रोजी आढळला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेच या व्हेरिएंटला एक्सई हे नाव दिले असून त्याबाबत काही दिवसांपूर्वीच सावधही केलेले आहे. एक्सई हा ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट बीए.१ आणि बीए.२ याचा रिकॉम्बिनेंट स्ट्रेन आहे.
दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांनी कोविड विषयक निर्बंध उठवले आहेत. अशावेळी नव्या व्हेरिएंटच्या एंट्रीने धाकधूक निर्माण झाली असून आरोग्य आणि सरकारी यंत्रणा यावर बारीक लक्ष ठेवून आहे.