नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत कधीच नव्हती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिले.
दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना सध्या भाजपविरोधात उभी आहे, असे सांगत त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारचे चांगले सुरू असल्याची ग्वाही देखील शरद पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.
लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यांच्यामध्ये पंतप्रधान कार्यालयात जवळपास २० मिनिटे चर्चा सुरू होती. दरम्यान या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण या चर्चेचा तपशील काय होता? याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवार म्हणाले, लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील कारवायांसदर्भात पंतप्रधान मोदींशी कुठलीही चर्चा झाली नाही. संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा यावेळी मांडला. विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या प्रलंबित नियुक्त्यांवर या बैठकीत चर्चा झाली. त्यांच्यावर कारवाईची गरजच काय होती? असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाईसंबंधी यावेळी कुठलीही चर्चा झाली नसल्याचेही यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.