मुंबई (विशेष प्रतिनिधी) : एक पत्रकार असूनही संजय राऊत यांनी अल्पावधीत कोट्यवधींची संपत्ती कमविली. त्यामुळे माझी राऊत यांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या पत्रकारितेतल्या यशाचे गमक इतर पत्रकारांनाही सांगावे, जेणेकरून राज्यातील पत्रकारही आपल्यासारखी चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती करू शकतील, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईने भारतीय जनता पार्टीला आनंद व्हायचे काही कारण नाही. संजय राऊत यांना नेहमीच पंतप्रधान मोदी यांच्यापासून भाजपच्या नेत्यांवर टीका करताना आनंदाच्या उकळ्या कशा फुटायच्या त्याची त्यांनी आठवण करावी. भाजपला काही उड्या मारायचे कारण नाही. कारण हा विषय भाजपचा नाही तर एका तपास यंत्रणेचा आहे, असेही ते म्हणाले. मंगळवारी ईडीने संजय राऊत यांच्या अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त केल्या. त्यावर राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर दरेकर यांनी आपले मत व्यक्त केले.
हा आघाडी सरकारच्या बदनामीचा प्रयत्न : तपासे
खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीच्या माध्यमातून जप्त करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचे तसेच आघाडीच्या नेत्यांवर सूड उगविला जात आहे. ही गोष्ट लोकशाही दृष्टिकोनातून योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने मंगळवारी जप्त केली आहे. त्यावर महेश तपासे यांनी संताप व्यक्त केला आहे.