Friday, May 9, 2025

महामुंबईठाणे

कल्याण तहसीलसमोर आरटीआय कार्यकर्त्यांचे उपोषण

कल्याण तहसीलसमोर आरटीआय कार्यकर्त्यांचे उपोषण

कल्याण : कल्याण ग्रामीण भागातील निळजे परिसरातील सरकारी गुरचरण जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सौरभ सिंह यांनी कल्याण तहसील कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने सिंग यांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.


निळजे गावातील महेंद्र पाटील यांनी सरकारी गुरचरण जागेवर अनधिकृत बांधकाम केले आहे. हे बांधकाम हटविण्याची मागणी सिंह यांनी तहसीलदारांकडे केली होती. तहसीलदारांकडे या प्रकरणी सिंग हे गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने अखेरीस सिंह यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा सिंह यांनी दिला आहे. या संदर्भात तहसीलदार जयराज देशमुख यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासमोर काही निवाड्यांची सुनावणी सुरू असल्याने त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.


दरम्यान महेंद्र पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गावच्या ग्रामसभेने ठराव करून ही जागा संकल्प बहुउद्देशीय समाजिक संस्थेला दिली आहे. ही जागा संस्थेच्या नावे करण्याच्या सरकारी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही जागा अद्याप संस्थेच्या नावे झालेली नाही. त्यामुळे या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचा तक्रारदाराचा दावा निराधार आहे.

Comments
Add Comment