Friday, October 17, 2025
Happy Diwali

महसूल कर्मचाऱ्यांची तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने

महसूल कर्मचाऱ्यांची तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने

नेरळ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारले आहे. संपावर गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. कर्जतच्या उपविभागीय कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

राज्यातील महसूल कर्मचारी आपल्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी विविध आंदोलने केल्यानंतर संपावर गेले आहेत. राज्यातील हे कर्मचारी ४ एप्रिलपासून संपावर गेले असून कर्जत तालुक्यातील प्रांत अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय येथे कार्यरत असलेले कर्मचारी यांनी संपात सहभाग घेतला आहे.

महासंघाचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष रवी भारती, कार्याध्यक्ष गोवर्धन माने, उपाध्यक्ष संदीप गाढवे, रोहित बागुल, तसेच कांबळे, मिलिंद तिर्हेकर, नीता गोरेगावकर, दिनेश गोल्हार, अप्पा राठोड, तेजल उंबरे, रवी तोंडरोड, अक्षय जाधव, वैभव जाधव, राठोड, सवणे, राहुल सूर्यवंशी, गुरले यांनी संपात सहभागी होत सलग दुसऱ्या दिवशी कोणतेही कामकाज केले नाही.

आज संपाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत साळवी, कार्याध्यक्ष कुरणे आणि कर्जत आणि खालापूर येथील संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी संवाद साधला.त्यावेळी कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर या सर्व कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

Comments
Add Comment