मुंबई (प्रतिनिधी) : हाफकिन जीव – औषध निर्माण महामंडळाची ‘रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार’ २०१९ साठी निवड करण्यात आली आहे. कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल या संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सांगितले.
कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी किमान २५ वर्षे काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे या पुरस्काराने गौरविण्यात येते. रुपये ७५ हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे दि. १९ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कारासह सन २०१९ मधील कामगार भूषण पुरस्कार आणि गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार्थींना गौरविण्यात येणार आहे.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, स्थानिक खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव आदी मान्यवरांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असेल.