Sunday, January 19, 2025
Homeदेशभेदभाव, भ्रष्टाचार हे व्होटबँकेच्या राजकारणाचे दुष्परिणाम

भेदभाव, भ्रष्टाचार हे व्होटबँकेच्या राजकारणाचे दुष्परिणाम

पंतप्रधान मोदींनी साधला विरोधकांवर निशाणा

भाजपाच ४२वा स्थापना दिनी मोदींनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अनेक दशके काही पक्षांनी व्होटबँकेचे राजकारण केले. भेदभाव, भ्रष्टाचार हे व्होटबँकेच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत. असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिवस बुधवारी ६ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यानिमित्त मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि पक्षाच्या कार्याबद्दल माहिती दिली.

अगदी मोजक्या जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपने पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केले आहे आणि एक राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष म्हणून ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चार राज्यांमध्ये भाजपाने घवघवीत यश मिळवले. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारतमातेला वंदन करत केली. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. भाजप काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या मार्गावर चालत असल्याचेही मोदी यांनी सांगितले. मोदी म्हणाले की, आज देशाकडे धोरणेही आहेत आणि इच्छाशक्तीसुद्धा आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर निशाणाही साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक क्षेत्रापर्यंत पोहोचेल तेव्हा देशात ‘सबका साथ-सबका विकास’ होईल.

ते म्हणाले, एक काळ आला होता, जेव्हा लोकांना असं सतत वाटत होतं की, कोणाचेही सरकार आले तरी आता देशाचे काहीही होणार नाही. पण भाजपने या धारणेमध्ये बदल घडवला. यंदाचा स्थापना दिवस तीन कारणांसाठी महत्त्वाचा ठरतो. पहिले कारण म्हणजे सध्या आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. ही प्रेरणेची खूप मोठी संधी आहे. दुसरे कारण म्हणजे वेगाने बदलणारी वैश्विक परिस्थिती. यामध्ये भारतासाठी नव्या शक्यता निर्माण होऊ लागल्या आहेत. तर तिसरे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. ते म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच चार राज्यांमध्ये भाजपची डबल इंजिनाची सरकारे परत सत्तेवर आली आहे. तीन दशकांनंतर राज्यसभेत कोणत्या तरी पक्षाच्या सदस्यांची संख्या १०० पर्यंत पोहोचली आहे. आज देशातला प्रत्येकजण म्हणतोय की देश वेगाने पुढे जात आहे. या अमृतकाळात भारताचे विचार आत्मनिर्भर होण्याचे आहेत, लोकल ते ग्लोबल होण्याचे आहेत, सामाजिक न्याय आणि समरसतेचे आहेत. याच संकल्पांना घेऊन एका विचारबीजाच्या रूपात आपल्या पक्षाची स्थापना झाली होती. म्हणून हा अमृतकाळ भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कर्तव्यकाळ आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचं सरकार राष्ट्रीयत्वाला महत्त्व देते. आज देशाजवळ धोरण आहे, निर्णय घेण्याची शक्ती आहे. जी लक्ष्ये आपण ठरवत आहोत, तीच पूर्णही करत आहोत. भारतात सातत्याने नव्या शक्यता निर्माण होत आहेत. सरकार देशहित लक्षात घेऊन निर्णय घेत आहे. आम्ही देशाच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करत आहोत. देशासाठी स्वतःला वाहून घ्यायचे आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या मार्गावर आता आम्हाला ‘सबका विश्वास’ मिळत आहे. कोरोनाकाळात देशाने आपली लक्ष्ये गाठली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -