नवी मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक शहर व सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात नागरी सुविधांचे जाळे उभारणे हे आधुनिकतेमध्ये भरच टाकते; परंतु नवी मुंबई शहराची स्थापना होऊन तीन दशके उलटली तरी ऐरोलीत शासनाचे शिधावाटप कार्यालय नसल्याने नागरिकांना छोट्या-मोठ्या कामांसाठी ठाण्याची वाट धरावी लागते. त्यामुळे हजारो नागरिक हैराण झाले आहेत. यासाठी काहींनी खुद्द अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना निवेदन देऊन गळही घातली आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या तत्कालीन आमदार मंदा म्हात्रे असताना त्यांनी देखील विधिमंडळात ह्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली होती.
नवी मुंबई शहरात वाशी येथे शिधावाटप कार्यालय आहे. ह्या कार्यालयाची मर्यादा बेलापूर ते घणसोली दरम्यान आहे; परंतु उर्वरित असलेला भाग म्हणजे रबाळे, ऐरोली, दिघा व चिंचपाडा, दिघा झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसाठी ठाणे येथे शिधावाटप कार्यालय आहे. याकार्यालयात झोपडपट्टी परिसरातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या सर्वात जास्त ग्राहकांची नोंद आहे. या नागरिकांना ठाणे येथे कामानिमित्त जाताना कायमचा त्रास होत आहे. त्यासाठी केंद्रस्थानी असलेल्या ऐरोली विभागातील मध्यवर्ती ठिकाणी शिधा वाटप कार्यालयाची बांधणी करणे अत्यंत अत्यावश्यक असल्याची मागणी होत आहे.
ऐरोली परिसरातील नागरिकांना बारा किलो मीटरवर असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपली कामे उरकावी लागत आहेत. नावात बदल करणे, नाव चढवणे, कमी करणे, खराब झालेली शिधा पत्रिका बदलणे, हरवलेली शिधा पत्रिका नवीन घेणे आदीसह इतर कामांसाठी पायपीट करावी लागत आहे. ऐरोली परिसरातील साधारणतः चाळीस हजाराच्या आसपास शिधा पत्रिकाधारकांची नोंद ठाणे येथील शिधा पत्रिका कार्यालयात आहे. त्यातील बहुतांशी शिधापत्रिका धारक हे सर्वसामान्य व गरजू नागरिक आहेत. त्यातील बहुतेक हे रोजंदारीवर असणारे नागरिक आहेत. त्यांना शिधा पत्रिका संबंधी काही कामे करायची असतील तर एक दिवस कामावर गैरहजर राहून जावे लागत आहे. त्यामुळे वेळ व पैश्यांचा अपव्यय होतोच. पण काम झाले नाहीतर त्रासात मोठी भर पडते. त्यामुळे ऐरोलीत शिधा पत्रिका कार्यालय अत्यंत अत्यावश्यक असल्याच्या मागणीला पाठिंबा मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गमरे यांनी सांगितले.
विधान परिषदेमध्येही विषय…
आमदार मंदा म्हात्रे या विधान परिषद सदस्य असताना त्यांनी अधिवेशनात ऐरोली येथे शिधापत्रिका कार्यालय कार्यान्वित करावे, म्हणून प्रश्न उपस्थित केला होता. तसेच तो चर्चिलाही गेला होता. ऐरोलीमध्ये शिधापत्रिका कार्यालयाची अत्यंत गरज भासत आहे. म्हणून आम्ही अन्न व पुरवठा मंत्र्यांबरोबर पत्रव्यव्हार केला आहे. मंत्री महोदय आमच्या मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार करतील. त्यामुळे नागरिकांची हैराणी कमी होईल. – अरविंद माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पदवीधर सेल, नवी मुंबई
ऐरोली येथील नागरिकांच्या समस्या पाहता प्रशासनाला कळविले जाईल. – जेडीआर सुरेंद्र ,शिधावाटप अधिकारी, ठाणे