मीनाक्षी जगदाळे
सुजाता (काल्पनिक नाव) अविवाहित, उच्चशिक्षित नौकरी करणारी मुलगी. संजय (काल्पनिक नाव) विवाहित असलेल्या दोन मुलं असलेल्या माणसासोबत चार वर्ष संबंध ठेवून आहे. दोघांनी मंदिरात जाऊन एकमेकांना माळा घातल्या असून ते फोटो तसेच त्यांच्यातील संभाषण, चॅटिंगचे पुरावे सुजाताकडे आहेत. सुजाता जेव्हा भेटायला आली, तेव्हा ती खूप डिस्टर्ब होती आणि तिचे एकच म्हणणे होते, ‘आता संजयला मी नको आहे, त्याने मागील सहा महिन्यांपासून मला भेटणं, बोलणं बंद केले आहे, माझा फोनही तो घेत नाही. त्याला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो तयार नाही. संजय माझ्या भावनांशी खेळला, माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे. त्याने पण माझ्यावर खूप प्रचंड प्रेम केलं आहे. मग आता अचानक तो का बदलला? आणि आता तो जर ऐकणारच नसेल, तर मला त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा आहे व त्याला दाखवून द्यायचे आहे की, माझ्या भावनांशी खेळणे त्याला किती महागात पडणार आहे.’
संजयचा कायदेशीर घटस्फोट नसल्याने, हे विवाहबाह्य संबंध नैतिकतेमध्ये बसवून आयुष्यभर नवरा-बायको म्हणून राहणेही शक्य नाही. संजयची बायको त्याला कधीही फारकत देणार नाही हेदेखील सुजाताला पहिल्यापासून माहिती होते. अशा वेळी सुजातासारख्या पीडित महिलेला समोरून मिळालेला धोका, विश्वासघात अथवा ब्रेकअप पचविणे अवघड होते. आपला वापर केला गेला, आपण मनापासून समोरच्यावर खरं प्रेम केले, विश्वास ठेवला, त्याला आपलं सर्वस्व अर्पण केले आणि त्याने अर्ध्या रस्त्यात त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्याला सोडले, हे सुजाताच्या सहनशीलतेच्या बाहेर होते. अशा प्रसंगातून उद्विग्न आणि मानसिक खच्चीकरण झालेली महिला मग काहीही करून समोरच्याचा सूड घेण्याच्या भावनेने पेटून उठते आणि तिला मिळालेल्या चुकीच्या सल्ल्यानुसार इतक्या वर्षांत परस्पर संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना जबरदस्ती, बलात्कार असे रूप देऊन माझ्यावर कसा अन्याय झाला म्हणून न्याय मिळवायचे प्रयत्न सुरू करते. अशी प्रकरणे खरंच बलात्कार असू शकतात काय?
पुरुषांना अशा केसची धमकी देऊन ब्लॅकमेल करणं खरंच योग्य आहे काय? वर्षांनुवर्षे एखाद्यासोबत स्वखुशीने आपण संबंध ठेवत असू, तर अचानक त्या घटनांना बलात्कार संबोधणे कितपत नैतिकतेला धरून आहे. सुजाताला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की, तिचीसुद्धा या प्रकरणात बदनामी होईल, पुढे लग्न होणे कठीण होईल. संजयला, त्याच्या पत्नीला भेटून चर्चा करण्यात आली. संजयचे म्हणणे होते की, ‘माझी चूक झाली, मी तिच्या नादी लागलो. माझ्या पत्नीसोबत या प्रकरणावरून भांडणे पण झालीत. आता मला यातून बाहेर पडायचं आहे, सुजाताने इकडे-तिकडे फोन करून माझ्यावर दबाव आणणे थांबवावे, ती माझ्याविरूद्ध पुरावे जमवून सगळ्यांना दाखवत सुटली आहे. ती मला आत्महत्या करण्याच्या धमक्या देते, सुजाताने लग्न करून तिच्या मार्गाला लागावं. तिने त्रास देणे थांबवले पाहिजे. संजयची बायको सुजाताविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचा विचार करीत होती. कारण उद्या सुजाताने आत्महत्या वगैरेचा प्रयत्न केला किंवा तिला काही झालं, तर संजयचे आयुष्य पणाला लागेल. त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल. याठिकाणी कोणीही दोष सुजातालाच देईल की, विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवताना तिने विचार करायला हवा होता. पण संजयनेही पत्नी असताना असे संबंध जोडणे व मनात येईल तेव्हा ते तोडून टाकणे कितपत योग्य आहे?
दुसरा एक विषय कायम समोर येतो की, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले गेले व नंतर लग्नाला पुरुषाने नकार दिला म्हणून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल व्हावा. वास्तविक या ठिकाणी महिलांची, मुलींचीही चूक आहे. आपल्या सामाजिक नितीमुल्यांनुसार पाहिले, तर कायदेशीर अथवा वैदिक पद्धतीने लग्न करून त्यानंतरच शारीरिक संबंध ठेवणे व वैवाहिक आयुष्य सुरू करणे हेच समाजरचनेला धरून आहे. दोघांनी लग्न करायचं ठरलेच आहे, तर तोपर्यंत महिला स्वतःची मर्यादा का पाळत नाही. समोरच्याला लग्न होईपर्यंत या अनुचित गोष्टी करण्यापासून थांबवत का नाहीत? त्यावेळेस स्त्री खंबीर होऊन हे का सांगू शकत नाही की, प्रेम आहे त्याला प्रेमच राहू देऊ. पण शारीरिक अपेक्षा पूर्ण करणे आता मला शक्य नाही व लग्न झाल्यावरच मी या गोष्टीला परवानगी देईल.
विवाहसंस्था याच सुरक्षेसाठी उदयाला आली आहे. लग्न करण्यामागे आव मगच शारीरिक संबंध ठेवण्यामागे जे काही वैचारिक, सामाजिक बंधन आहे ते आपणच झुगारून द्यायचे, आपणच स्वतःच्या खुशीने, मर्जीने समोरच्याला परवानगी द्यायची. मग संबंधित पुरुषाने लग्न करतो असे आमिष दाखवून बलात्कार केला म्हणून त्याला बरबाद करायचे? सुख उपभोगताना, जर विवाहापूर्वी तुम्ही स्त्री असून मर्यादा ओलांडल्या, पुरुषाला तुम्ही स्वतः संधी दिली, वेळीच नकार दिला नाही, तर एकटा पुरुष बलात्कारी कसा ठरू शकतो?
समुपदेशनच्या अनेक प्रकरणांमधून असेही समोर येते की, काही महिला स्वतःला साधीसरळ, दाखवून हेतूपुरस्सर आर्थिकदृष्ट्या सबळ, समाजात नावलौकिक असलेल्या पुरुषांना स्वतःच्या प्रेमात ओढून, त्याच्या पैशांचा उपभोग घेऊन कालांतराने त्याच्याकडून मोठी रक्कम अथवा मोठा आर्थिक फायदा मिळण्याची मागणी करतात. तसे न केल्यास बलात्कारचा गुन्हा दाखल करेल म्हणून धमक्या देतात. पुरुष प्रतिष्ठित असल्याने स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी महिलेच्या अशा मागण्यांना बळी पडून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेताना दिसतात. अशा मनोवृत्तीच्या महिला नियोजनपूर्वक स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी पहिल्यापासूनच दोघेही एकत्र असतानाचे फोटो, व्हीडिओ, कॉल रेकॉर्डिंग जे पुरावे म्हणून वापरणे शक्य होईल, अशी तयारी करीत असतात. पुरुषाने मागणीनुसार रक्कम द्यायला नकार दिला, तर त्याला बदनाम करणे, ब्लॅकमेल करणे, आत्महत्या करण्याची धमकी देणे, त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार करण्याची तयारी ठेवणे ही भूमिका घेतात.
अशा मनोवृत्तीच्या महिलांमुळे प्रत्येक महिलेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होतो आहे आणि जी खरंच पीडित महिला आहे तिच्यावर विश्वास ठेऊन तिला न्याय मिळवून देण्यासाठी कोणी लवकर पुढे येत नाही. वर्षांनुवर्षे एखाद्या ठिकाणी नेऊन, बोलावून, कोणाला सांगितले तर बदनामीची, जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन अथवा तरुण मुलींशी एका किंवा अनेक पुरुषांनी अतिप्रसंग करण्याच्या घटना सातत्याने ऐकायला येतात. अशा प्रसंगांना मुलींनी धाडसाने तोंड देणे आवश्यक आहे. वर्षांनुवर्षे असा अत्याचार सहन करीत राहणे म्हणजे स्वतःला प्रचंड त्रास, मनस्ताप करून घेणे आहे. पहिल्यांदाच जेव्हा कोणाचा असा कोणताही अनुभव येतो तेव्हाच कोणत्याही धमकीला न घाबरता आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
नाबालिक मुलीं-मुलांवर जर कोणी अशा स्वरूपाची जबरदस्ती करीत असेल, तर त्याला POCSO (लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम) यानुसार तक्रार करता येते. त्यामुळे बलात्कार या गुन्ह्यासाठी असलेल्या कायद्यांचा महिलांनी विनाकारण गैरवापर न करता सर्वांनी खरंच जिथे महिला पिडीत आहे, तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.