Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीराज्यसभेत भाजपचे शतक

राज्यसभेत भाजपचे शतक

इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर

राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे, १९९० नंतर प्रथमच एका राजकीय पक्षाने राज्यसभेत शंभरी ओलांडली आहे. ३२ वर्षांनंतर राज्यसभेत खासदारांची शंभर संख्या पार करण्याचा मान भाजपला मिळाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपने प्रत्येकी एक जागा जिंकली आणि वरिष्ठ सदनातील सदस्य संख्येचे शतक पूर्ण केले. राज्यसभेच्या रिक्त असलेल्या तेरा जागांसाठी सहा राज्यांत निवडणुका झाल्या. त्यात आसाम २ जागा, हिमाचल प्रदेशात १, केरळमध्ये ३, नागालँडमध्ये १, त्रिपुरात १ आणि पंजाबमधील ५ जागांसाठी निवडणूक झाली. भाजपला पंजाबमध्ये एक जागा गमवावी लागली. मात्र इशान्येकडील तीन राज्ये व हिमाचल प्रदेशात भाजपने विजय संपादन केला.

राज्यसभेतील एकूण २४५ जागांमध्ये आता भाजपचे खासदार १०१ आहेत. काँग्रेसचे २९, तृणमूल काँग्रेसचे १३, आम आदमी पक्षाचे ८, द्रमुकचे १० व छोट्या प्रादेशिक पक्षांचे मिळून अन्य ८४ आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या खासदारांची संख्या ११७ झाली आहे. राज्यसभेत बहुमतासाठी १२३ हा आकडा आहे. भाजप हळूहळू बहुमताकडे चालला आहे. २०१४मध्ये राज्यसभेत भाजपचे ५५ खासदार होते. तेव्हापासून राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला राज्यसभेत काँग्रेसच्या खासदारांचा दबदबा होता. सर्वाधिक खासदार काँग्रेस पक्षाचे होते किंवा काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या मोठी होती. १९८८मध्ये काँग्रेसचे राज्यसभेत १०८ खासदार होते. १९९०मध्ये झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीनंतर काँग्रेसच्या खासदारांची संख्या घसरली आणि ९९ झाली. २०१२-२०१३ दरम्यान काँग्रेसच्या खासदारांची संख्या ७२पर्यंत खाली आली. तेव्हापासून काँग्रेसची घसरण चालूच आहे.

राज्यसभेच्या रिकाम्या झालेल्या ५२ जागांसाठी लवकरच निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड अशा बिगरभाजप राज्यांत निवडणूक होणार आहे. या राज्यात सत्ताधारी पक्षांची सदस्य संख्या भाजपपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तेथे बिगरभाजप पक्षांना लाभ मिळेल, असे वातावरण आहे. पंजाबात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सर्व पाचही उमेदवार निवडून आले. दिल्लीतील राजेंद्र नगरमधील आमदार राघव चड्डा, क्रिकेटपटू हरभजन सिंह, संदीप पाठक, संजीव अरोडा व अशोक मित्तल हे राज्यसभेवर निवडून आल्यामुळे आपच्या खासदारांची संख्या आठ झाली आहे. पंजाबमधून राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या दोन जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक होणार आहे. आम आदमी पक्षाकडे दोन तृतियांशपेक्षा जास्तीचे बहुमत असल्याने या दोन्ही जागा आपल्याला मिळतील व राज्यसभेतील आपच्या खासदारांची संख्या दहा होईल.

दि. ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. ४२ वर्षांत भाजपने देशभर प्रगती केली. त्यात नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केलेली घोडदौड विलक्षण आहे. राज्यसभेत बहुमत गाठणे कोणत्याही पक्षाला सोपे नाही. भाजपने शंभरीचा आकडा पार करून काँग्रेसला मागे सारलेच आहे. पण लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही नं. १चा पक्ष असे स्थान मिळवले आहे. भाजपचे सुरुवातीला केवळ पाच सदस्य राज्यसभेत होते. जगन्नाथराव जोशी (दिल्ली), राम लखन प्रसाद गुप्ता (बिहार), मोहिंदर कौर (हिमाचल प्रदेश), हरि शंकर भाभडा (राजस्थान) आणि जगदीश प्रसाद माथूर (उत्तर प्रदेश) असे पक्षाचे पाच खासदार राज्यसभेत होते. तेव्हा कोणी कल्पनाही केली नव्हती की, भाजपचे केंद्रात स्वबळावर सरकार स्थापन होईल व राज्यसभेत शंभरपेक्षा जास्त खासदार असतील.

निवडणुकीच्या पुढच्या फेरीत मध्य प्रदेशातून जे. के. जैन बिहारमधून अश्विनीकुमार, मध्य प्रदेशातून प्यारेलाल खंडेलवाल व राजस्थानमधून जसवंत सिंग यांचा राज्यसभेत प्रवेश झाला. १९८२ मध्ये भाजपचे संस्थापक सदस्य – अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पोहोचले. भाजपच्या स्थापनेनंतर दोनच वर्षांत म्हणजे १९८२ मध्ये भाजपच्या खासदारांची संख्या दहा झाली. १९८४ मध्ये मध्य प्रदेशातून भाजपच्या विजयाराजे शिंदे, बिहारमधून कैलाशपती मिश्र, गुजरातमधून शंकरसिंह वाघेला राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले. १९८४ मध्ये लोकसभेत भाजपचे केवळ दोन सदस्य होते. त्यावेळी लोकसभेपेक्षा राज्यसभेत भाजप खासदारांची संख्या मोठी होती. १९८९ मध्ये उत्तर भारतात भाजपचा प्रभाव वाढू लागला, तसे लोकसभा व राज्यसभेतील पक्षाच्या खासदारांची संख्या वाढू लागली.

२०१४ मध्ये देशाच्या राजकीय पटलावर मोदी-शहा युग सुरू झाले. लोकसभा व राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांची संख्या वेगाने वाढू लागली. तेव्हा भाजपचे राज्यसभेत ५५ सदस्य होते, गेल्या आठ वर्षांत त्यात ४६ नव्या खासदारांची भर पडली. ३ मे अगोदर केंद्र सरकारच्या वतीने राज्यसभेवर सात नामनियुक्त सदस्यांची शिफारस केली जाईल. अगोदरच्या सहा नामनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ २४ एप्रिल रोजी संपत आहे, तर एका सदस्याची मुदत १ मे रोजी संपणार आहे. कभी अलविदा ना कहना… गाणे गाऊनच राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या ७२ सदस्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत गेल्याच आठवड्यात निरोप देण्यात आला.

चलते-चलते, मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना असे गीत म्हणत निवृत्त होणाऱ्या सदस्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. मार्च ते जुलै या काळात त्यांची मुदत संपत आहे. मेरी कोम, रूपा गांगुली, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुलाम नबी आजाद, जयराम रमेश आदी सदस्यांची मुदत संपत आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल, डाॅ. विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे (भाजप), पी. चिदंबरम (काँग्रेस) यांचीही सदस्यत्वाची मुदत संपत आहे.

sukritforyou@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -