नाशिक (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते दादासाहेब वडनगरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे पक्षध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व सामूहिकरित्या पक्षाची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच दुचाकी रॅली शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली. रॅली मार्गक्रमण करत असताना जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सीबीएस जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून रॅली मार्गक्रमण झाली.
या प्रसंगी नाशिक शहरातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवला.
भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने जनसंघ ते भाजपच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिले त्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यात प्रामुख्याने माजी आ. निशिगंधा मोगल, मंगला जोशी, माजी उपमहापौर शोभना आहेर, राजाभाऊ मोगल, सतीश शुक्ल, मिलिंद हिरे, अभय छल्लानी, अरुण शेंदुर्णीकर, प्रदीप पाटील, शैलेश जुन्नरे आदींचा समावेश होता.
सत्काराला उत्तर देताना माजी आ. निशिगंधा मोगल यांनी संघटना ही सर्वोच्च आहे. तर कार्यकर्ता हे पद सर्वात मोठे पद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मध्य मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी व आभारप्रदर्शन वसंत उशीर यांनी केले.
यावेळी संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, रोहिणी नायडू, अलका जांभेकर, नंदकुमार देसाई, हिमगौरी आडके, ललिता बिरारी, योगेश हिरे, शिवाजी गांगुर्डे, स्वाती भामरे, पुष्पा शर्मा, सोनल दगडे, संगीता जाधव, आदी उपस्थित होते.