Tuesday, July 16, 2024
Homeमहामुंबईमान्सूनपूर्व वृक्ष छाटणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

मान्सूनपूर्व वृक्ष छाटणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात झाडे कोसळू नये व फांद्या पडून अपघात होऊ नये यासाठी महापालिका वृक्ष छाटणी करत असते. दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून मान्सून पूर्व वृक्षछाटणीस सुरुवात झाली आहे. मात्र यंदा या वृक्ष छाटणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ‘मॅक लिफ्टन’मुळे झाडाच्या उंचीपर्यंत पोचणे शक्य होत असून झाडांची गरजेनुसार छाटणी होण्यास मदत मिळत आहे. यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक ते तांत्रिक प्रशिक्षण पालिकेकडून दिले जात आहे.

मुंबईत पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना घडतात. त्यावर उपाय म्हणून उद्यान विभागातर्फे उंच वृक्षांवरील मृत व धोकादायक फांद्या छाटणीचे काम केले जाते. याआधी हे काम मनुष्यबळाने केले जात होते, मात्र आता मात्र फांद्या छाटणीसाठी ‘मॅक लिफ्टन’ हे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. या तंत्रज्ञानामुळे फांद्यांच्या उंचीपर्यंत पोचण्यास आणि नेमकी छाटणी करण्यास मदत मिळत आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

दरम्यान मुंबईत ३० लाखांहून अधिक झाडे आहेत. त्यातील १ लाख ९४ हजार झाडे महापालिकेच्या रस्त्यावर आहेत तर झाडांबाबतचा सर्व्हे हा १५ मे पर्यंत पूर्ण होणार असून छाटणीचे कामही पूर्ण होईल असेही परदेशी यांनी सांगितले. आतापर्यंत २१ हजार ७५५ झाडांची छाटणी केल्याची माहिती परदेशी यांनी दिली.

दरम्यान सोसायट्यांच्या आतील झाडांची छाटणीही केली जात आहे. त्यासाठी पालिकेने आतापर्यंत ५ हजार २६२ नोटीसा जारी केल्या आहेत. आपल्या परिसरातील मृत व धोकादायक वृक्ष/ फांद्या आढळल्यास विभाग स्तरावर उद्यान विभागाशी संपर्क करून रीतसर परवानगी घेऊन मृत व धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात यावी असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -