नवी मुंबई (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांना त्रास कमी व्हावा. हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन पालिकेने मालमत्ता कर भरणा करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केली; परंतु ही प्रणाली आता नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. त्यावर संबंधितांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा महसूल प्राप्तीचा मार्ग म्हणजे मालमत्ता करातून मिळणारे आर्थिक बळ. त्यासाठी पालिकेकडून नागरिकांना पालिकेच्या कार्यालयाची वाट धरायला लागू नये व सुलभतेने पैसा गंगाजळीत यावा, यासाठी ऑनलाइन प्रणालीचा मार्ग अवलंबिला आहे. पण ऑनलाइनच्या माध्यमाने पैशांचा भरणा करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरवासी करदात्यांचा मालमत्ता कर भरणा भरायला उदंड प्रतिसाद आहे; परंतु कर भरल्यावर येणाऱ्या पावतीवर पालिकेचे नाव असणे अत्यंत अत्यावश्यक आहे. भरणा केल्यावर जी पावती ग्राहकाला प्राप्त होते. त्यावर फक्त मालमत्ता क्रमांक, मालमत्ताधारकाचे नाव तसेच मालमत्ता करासंबंधी मूल्यच पावतीवर लेखी येत असते; परंतु त्यावर पालिकेचे नाव मात्र येत नाही. तसेच मालमत्ताधारकांचा नाव व पत्तादेखील येत नाही. त्यामुळे मालमत्ता कर भरल्यावर घरातील इतर कागदपत्रात मालमत्ता कराची पावती ठेवली व काही दिवसांनी कागदपत्र तपासणी करायला गेल्यास त्या पावतीचा बोध होत नसल्याचे करदात्यांचे म्हणणे आहे.
मालमत्ता कर ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्याने नागरिकांना त्रास कमी होत असला तरी अनेकदा सर्व्हर डाऊन किंवा ऑनलाइन प्रणाली खंडित होण्याचा प्रकार नेहमीच होत आहे. यावर प्रतिबंध येणे गरजेचे आहे.
बरेचदा ग्राहक ऑनलाइनद्वारेच मालमत्ता कर भरण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी ते वारंवार प्रयत्न करतात. पण ऑनलाइन प्रणाली बंद राहत असल्याने मग त्याकडे दुर्लक्ष करत असतात. मग जेव्हा दुसरी मालमत्ता कर पावती येते, तेव्हा त्यांना नाहक आर्थिक दंडाला सामोरे जावे लागत आहे.
मालमत्ता कर भरणासंबंधी ज्या यांत्रिक चूका असतील.त्या संबंधी तज्ज्ञांना सांगून अडचणी दूर केल्या जातील. – सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, पालिका