मुंबई: समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. समृद्धी महामार्गाबाबत कोणीही कितीही प्रयत्न केले तरी माझे नाव त्यांना मिटवता येणार नाही. हे जनतेचे श्रेय आहे. त्यांनी मला तेव्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली म्हणून मी समृद्धी महामार्गाबाबत निर्णय घेऊ शकलो. २० वर्षांपासून ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. त्यामुळे आता कोणीही हे श्रेय हिरावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं १ मे रोजी उद्घाटन करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना आदेश देखील दिले आहेत. त्यामुळे एकीकडे नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे या रस्त्याच्या श्रेयाचा वाद निर्माण झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा घाट घालताना शिवसेना त्याचं श्रेय घेत असल्याचा दावा केला जात असताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनाला राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यापासूनही ठाकरे सरकार फडणवीसांना बाजूला ठेवणार का, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी विचारले असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारला अप्रत्यक्षपणे टोले लगावले. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, त्यावेळी समृद्धी महामार्गाच्या उभारणीला जे लोक विरोध करत होते, ते लोकही आज रस्त्याच्या उद्घाटनासाठी प्रयत्न करत आहेत. हे पाहून मला आनंद वाटतो, असे फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतरच त्याचं उद्घाटन करण्यात यावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. “समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे. त्यासाठी मला आनंद आहे. मला इतकंच वाटतंय की त्याची कामं पूर्ण झालेली नाहीत. ती पूर्ण करूनच उद्घाटन झालं, तर चांगलं होईल. घाईघाईत उद्घाटन आटपून घेतलं, तर रस्ता सुरू होईल पण त्यातून त्या रस्त्याला जे महत्त्व आहे , ते कमी होईल. त्याचं कधीही उद्घाटन झालं तरी मी त्याचं स्वागतच करेन”, असं फडणवीस म्हणाले.