शिबानी जोशी
वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमोद करंदीकर हे १९७८ पासून कार्यकर्ते होते. सुरुवातीला कार्यकर्ते नंतर महाराष्ट्र प्रांताची जबाबदारी त्यांच्याकडे होती. अनेक वर्षं आदिवासी भागात वनवासी कल्याण आश्रमाच काम करत असल्यामुळे वनवासी तसेच वंचित भागातील गरजा काय आहेत, त्या त्यांना प्रकर्षाने जाणवल्या होत्या. मुंबईपासून जवळच असलेल्या कर्जत तालुक्यात कुपोषणाची खूपच मोठी समस्या त्यांच्या लक्षात आली आणि केवळ ठरावीक हेतू निश्चित करून काम करायचं असेल तर एक स्वतंत्र व्यवस्था असायला हवी या उद्देशाने त्यांनी २००३ साली काही कार्यकर्ते आणि पत्नीसह शबरी सेवा समिती या संस्थेची स्थापना केली. जव्हार, कर्जत या ठिकाणी उपोषणामुळे बालमृत्यूचा मोठा प्रश्न त्यांना दिसला. बालमृत्यू रोखण्यासाठी खूप वेगळा वेळ द्यायला लागेल हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कर्जत तालुक्यात हळूहळू छोटे-मोठे काम करायला तिथे सुरुवात केली होतीच; परंतु २००३ रितसर संस्थेची स्थापना करून त्यानी कामाला वेग दिला. संस्था सुरू करताना कर्जतचे डॉक्टर निळकंठ फडके तसेच डोंबिवलीचे काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. २००३ ते १००८ या काळामध्ये कर्जत तालुक्यामध्ये फक्त कुपोषण आणि बालमृत्यू या विषयावरचा वन पॉइंट प्रोग्रॅमच त्यांनी हाती घेतला आणि त्याला खूपच चांगलं यश मिळालं. कर्जत तालुक्यात ७०० ते ८०० मुले दरवर्षी कुपोषित दिसून येत होती, त्यातील ७० ते ८० मुलांचा मृत्यू होत असे. कुपोषित मुलं म्हणजे त्याची वाढ खुंटते, काही आजारांमुळे ती खंगत जातात, त्यांना योग्य आहार मिळत नाही अशा मुलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी मेडिकल कॅम्प, बालरोगतज्ज्ञांना तिथे नेणं, काही मुलांना रुग्णालयात दाखल करणं, योग्य आहार देणे, योग्य आहार साधा सोपा कसा शिजवायचा आणि केव्हा द्यायचा, स्वच्छता हे त्यांच्या आईंना सांगणं अशा तऱ्हेने त्यांच्यासाठी सर्वांगीण काम सुरू केलं. सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण स्थानिकांना असं वाटायचं की, अनेक संस्था येथे काहीतरी मदत द्यायला येतात. तसेच हे सुद्धा आले आहेत; परंतु जेव्हा त्यांना कळलं की हे फक्त एकदाच येऊन फोटो काढून जाणारे कार्यकर्ते नाहीत. यांना शाश्वत विकास साधायचा आहे, त्यानंतर त्यांनी तसेच उपक्रमात सहभागी व्हायला सुरुवात केली. म्हणजे अगदी सुरुवातीला साबण द्यायचे, हात कसे धुवायचे ते सांगायचे, नेलकटर घेऊन जायचं आणि त्यांची हातापायाची नखं स्वतः कापून द्यायची असं केल्यामुळे त्यांना करंदीकर, त्यांच्या पत्नी व कार्यकर्ते आपलेसे वाटू लागले. सुरुवातीला त्यांचे खेळ घेणे, छोटासा खाऊ देणे असे करून मुलांना गोळा करायला सुरुवात केली होती. असे सातत्याने पाच वर्षं केल्यानंतर कर्जत तालुक्यातील तरी कुपोषणाची समस्या खूपच कमी आणण्यात त्यांना यश मिळाले. आपले काम योग्य मार्गाने जात आहे हे कर्जत तालुक्यात लक्षात आल्यानंतर त्यांनी इतर तालुक्यातही हे काम सुरू केले. कर्जत, मोखाडा, जव्हार, अक्कलकुवा अशा ठिकाणी ही कामं सुरू केली. चांगल्या कामाला नेहमीच हातभार मिळतो तसा दादरचे सुप्रसिद्ध डॉक्टर कै. अजित फडके यांचा आधार त्यांना मिळाला तसेच तिथले सरकारी अधिकारी सुद्धा नंतर सरकारी योजना राबवण्यासाठी त्यांना चांगलं सहकार्य करू लागले. हे काम करत असताना लक्षात आलं की, कुपोषणाचा प्रश्न हा एकमेव प्रश्न नसून त्याच्याशी अनेक प्रश्न निगडित आहेत, जसं माता आरोग्य, आईसाठी उत्पन्नाचा स्रोत, बालकांचे शिक्षण, गरिबी यावरही म्हणूनच करंदीकर यांनी काम सुरू केले. वेगवेगळ्या ठिकाणी जागा घेणं शक्य नसल्यामुळे कामापुरती एखादी जागा भाड्याने घेऊन तिथे काम सुरू करायचं. इथल्या महिलांना विनामूल्य शिवणकाम शिकवून झालं की तिथून बाहेर पडून दुसऱ्या गावात जागा भाड्याने घ्यायची आणि शिवणकामाचे वर्ग सुरू करायचे, अशा पद्धतीने महिलांसाठी काम चालतं आहे. यामुळे या महिलांना घरच्या घरी काम मिळाल्यामुळे त्या मुलांकडे लक्ष देऊ शकतात, त्यांना मोलमजुरीसाठी बाहेर पडावे लागत नाही.
सध्या संस्थेतर्फे आरोग्य, शिक्षण, कृषी विकास आणि महिला स्वावलंबन अशा क्षेत्रांत विविध उपक्रम राबवले जात आहेत. आतापर्यंत वीस हजार कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. कुपोषित बालकांची नियमित चाचणी, गर्भवती महिलांची नियमित चाचणी, युवतींना प्रशिक्षण, नियमित आरोग्य शिबिरे भरवली जातात. आठ तालुक्यांत नियमित अभ्यासिका चालवल्या जातात. काही शाळांना स्वच्छता गृह, सभागृह बांधून देण्यासाठी मदत केली आहे. १०० ते १२५ शाळांमध्ये नियमित शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. कशेळे येथे ३५ विद्यार्थ्यांची सोय होईल, असं वसतिगृह उभारण्यात आलं आहे. महिला वाचनालये सुरू केली. जलसिंचन कार्यामध्ये २९ विहिरी बांधण्याचे कार्य पूर्ण केलेे. शेती आणि फलउत्पादनात जवळजवळ पाच हजार कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. २०,००० आंबा लागवड आणि ५०,००० साग आणि बांबूंची लागवड करून देण्यात संस्था यशस्वी झाली आहे. गेल्या १० वर्षांत दहा ठिकाणी शिवन प्रशिक्षण केंद्र सुरू करून अंदाजे साडेसातशे महिलांना शिवण शिकवलं आहे. त्यातील साडेचारशे महिला स्वावलंबी झाल्या आहेत. ‘कन्या बचाओ, कन्या पढाओ’ या उपक्रमासाठी कन्यापूजन सारखे कार्यक्रम आयोजित करून घरात करण्याचे महत्त्व कसं आहे हे दाखवलं जातं.
करंदीकर स्वतः किंवा त्यांचे कार्यकर्ते सतत प्रवास करत असतात. प्रवास करत असताना एखाद्या ठिकाणी एखादा प्रश्न जाणवला की त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी कार्य सुरू केलं जातं. ज्येष्ठ व्यक्तींना धड जेवायला मिळत नाही.अशा वेळी त्यांना शिधा द्यायला सुरुवात केली आणि असा गावकुसातला एकल, गरीब वृद्धांचा प्रश्न लक्षात आल्यावर जवळजवळ चारशे साठ जणांना ६५० रुपयांचा नियमित शिधा पुरवठा करण्याचे काम संस्था करत आहे. माणगाव, जव्हार, नवापूर तालुक्यात हे काम चालते. शासन रेशनवर अन्नधान्य देते पण तिथपर्यंत वृद्धांना, अपंगांना पोहोचता येत नाही. तेथे घरपोच सुविधा देण्यात आल्या. शबरीने ज्या भक्तिभावानं श्रीरामाला आपल्याकडे असेल ते अर्पण केलं, त्याप्रमाणेच आपणही भक्तिभावानं समाजाला काहीतरी अर्पण करावं म्हणून शबरी सेवा समिती हे नाव घेऊन संघ स्वयंसेवकांनी स्थापलेली ही संस्था गेली १८ वर्षं कार्य करत आहे.
[email protected]