मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना खा. संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता अंमलबजावणी संचालनालयाने गोरेगाव येथील पत्रा चाळ घोटाळ्यात खा.राऊत यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राऊत यांनी ८ महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रु. भरून आपल्या गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. आपल्यावर कारवाई होणार या भीतीने हबकलेल्या राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर आरोप करणे सुरु केले होते. मात्र या दबावाला न जुमानता अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे.
खासदार राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रु. भरले तेंव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांना जाब विचारायला हवा होता. मात्र तसे न करता ठाकरे सरकारने पोलिसांवर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला, असेही सोमय्या यांनी नमूद केले.
हेच राऊतांवरील संस्कार : चंद्रकांत पाटील
ईडीच्या कारवाईनंतर खा. संजय राऊत यांनी संबंधित यंत्रणा, किरीट सोमय्या आणि भाजपवर केलेल्या सडकून टीकेचा आणि आक्षेपार्ह शब्दांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, संजय राऊतांची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसते का, अशी विचारणा केली आहे. त्यात नवीन काय? त्यांना जे संस्कार आहेत, त्यानुसार ते बोलतात. गेल्या दोन अडीच वर्षांत रोज ते शिव्या देत आहेत. त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या भाषेची अपेक्षा आहे, असे ते पुढे म्हणाले. राऊत यांनी सोमय्या यांच्यावर हल्लाबोल करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला.
काळा पैसा बाहेर आला : निलेश राणे
माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधताना काळा पैसा बाहेर आल्याची प्रतिक्रिया दिली. राऊतांची जी काही संपत्ती ईडीकडून अटॅच करण्यात आलीय. ती संपत्ती आहे हे कशावरुन? हा काळा पैसा आहे असं मी समजतो. जे काय सापडलंय ते ईडीलाच माहित. पण आज ना उद्या हे संजय राऊतांसोबत होणारचं होतं.कारण इतका कोंबलेला पैसा हा कधी ना कधी बाहेर येणारच होता. कितीही तडफड केलीत तरी सुटका नाहीच, संजय राऊतांना अटक होणारच, असे भाजपा नेते निलेश राणे म्हणाले.
आता स्पष्टीकरण देण्याचं काम राऊतांचं आहे. कुठून आला हा पैसा? फक्त सामानाचा पगार घेऊन? हे जे काही गाड्या फिरवतात, ज्या घरात राहतात हे सगळं त्या पगारातून आलंय का हे दाखवण्याची वेळ आलीय आता. आता राऊत काय बोलतात त्याला महत्व नाही. मनी लॉन्ड्रिग कायद्याअंतर्गत हा पैसा आला कुठून याचा पुरावा आता राऊतांना द्यावा लागेल, असे निलेश राणे म्हणाले.
राऊत यांना अटक करावी : नितेश राणे
संपत्तीवर टाच आणण्याची कारवाई ईडीकडून करण्यात आल्यानंतर राऊत यांना अटकही करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ईडीची कारवाई योग्य आहे. तसेच या केंद्रीय यंत्रणेचा तपास योग्य दिशेने आहे. अशा यंत्रणा पुराव्याशिवाय कुठलीही कारवाई करत नाही. मात्र, इथेच न थांबता ईडीने राऊत यांना ताब्यात घेतल्यास त्यांच्या अनेक बेनामी मालमत्ता जनतेसमोर येतील, असे नितेश राणे पुढे म्हणाले.