
मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबईला उन्हाच्या झळा पोहचत असून मुंबईत आर्द्रता ९१ टक्क्यांवर पोहचली आहे. सकाळचे किमान तापमान २७ अंशाच्या आसपास पोहचल्याने रात्री देखील उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शक्य तितके बाहेर फिरणे कमी करा, असे आवाहन हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केले आहे.
दरम्यान काही दिवसांपासून मुंबईतील कमाल तापमान वाढले होते. मात्र असे असले तरी किमान तापमान नियंत्रणात होते. त्यामुळे दिवसा उकाडा वाढला असला तरी रात्रीच्या वेळी मात्र गारवा जाणवत होता. मात्र सोमवारी वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले असून रात्रीच्या कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे.
कुलाबा २५.६ तर सांताक्रूझ २६.८ अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवण्यात आले. आर्द्रता कुलाबा ९१ टक्के तर सांताक्रूझ ७४ टक्के इतकी आहे. गेल्या आठवड्यात किमान तापमान हे २२/२३ अंशाच्या आसपास होते. तर आर्द्रता ५० टक्क्यांच्या आसपास होती. किमान तापमानात ३ ते ४ अंशाची वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीही प्रचंड गरमीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान मुंबईत उन्हाळा खऱ्या अर्थाने जाणवू लागला आहे. एप्रिल महिना हा सर्वाधिक तापदायक ठरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. तर घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.