इम्रान यांनी अविश्वास ठराव टाळला, पण...

रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची दाहकता कमी होत असतानाच आशिया खंडातील पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमधील वातावरणाची जगभरात चर्चा आहे. भारताचा शेजारी मात्र, कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय पेच सुरू आहे. पाकिस्तानात गगनाला भिडलेली महागाई, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था त्याचसोबत सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची घसरणीला लागलेली लोकप्रियता पाहता विरोधी पक्षांनी इम्रान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी अविश्वास ठराव आणला. इम्रान यांच्या सरकारमधील सहयोगी पक्ष असलेल्या मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान या पक्षानेही विरोधकांशी हातमिळवणी केल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे काही खरे नव्हते. प्रत्यक्ष मतदान झाल्यास इम्रान यांची गच्छंती अटळ होती; परंतु पंतप्रधान इम्रान खान यांनी शेवटच्या क्षणी अप्रतिम चाल रचली.


पाकिस्तानच्या संसदेचे उपसभापती कासिम खान सुरी यांनी सरकारविरोधात सादर करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावत विरोधकांना धक्का दिला. परदेशी कटातून हा प्रस्ताव आणण्यात आला असल्याचा आरोप करत कासिम यांनी प्रस्ताव फेटाळला आणि मतदान घेण्याचे टाळले. त्यामुळे इम्रान खान यांना बाजूला करत सत्तेवर येण्याचे विरोधकांचे स्वप्न धुळीस मिळाले. संसद बरखास्त करण्याची केलेली मागणी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी मान्य केली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील जनतेला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. देशात पुढील ९० दिवसांमध्ये निवडणुका होतील. अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याची कृती संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) पक्षाने केला आहे. हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र सुप्रीम कोर्टाने संसदेच्या निर्णयामध्ये लक्ष घालण्यास नकार दिला. अविश्वास ठराव फेटाळल्याने इम्रान आणि त्यांच्या पक्षाने तात्पुरता सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.


पाकिस्तानची संसद बरखास्त झाल्याने इम्रान यांना पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. कधी कोणाला सभागृहात हरवले, तर कुणाला लष्कराने हटवले. इम्रान यांची खुर्ची ३ वर्षे २२८ दिवस टिकली. सर्वाधिक कालावधी पूर्ण करण्यात ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आजपर्यंत पाकिस्तानमध्ये ३० पंतप्रधान झाले आहेत, त्यापैकी सात पंतप्रधान काळजीवाहू (केअऱ टेकर) होते. म्हणजेच एकूण २३ वेळा कोणाला ना कोणाला तरी पाकिस्तानने पंतप्रधानपदावर बसवले. सर्वाधिक कालावधी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या नावावर आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी शपथविधी झालेल्या लियाकत खान यांची ४ वर्षे आणि ६३ दिवसांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानच्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत.


३ वर्षे ३२५ दिवसांनंतर लष्कराच्या बंडखोरीच्या आरोपाखाली त्याला फाशी देण्यात आली. १९८८ मध्ये बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. मात्र त्या केवळ १ वर्ष २४७ दिवसांच्या पीएम राहिल्या. बेनझीर यांचे सरकार १२ मतांनी पडले. नोव्हेंबर १९९० मध्ये त्यांच्या जागी आलेल्या पाकिस्तान मुस्लीम लीगच्या नवाझ शरीफ यांनी २ वर्षे आणि २५४ दिवस सत्ता उपभोगली. १९९७मध्ये नवाज शरीफ पूर्ण बहुमताने परतले. यावेळी त्यांचे सरकार केवळ २ वर्षे २३७ दिवस टिकले. लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांनी शरीफ यांची खुर्ची उलथवून टाकली. त्यानंतर जनरल मुशर्रफ यांनी पाकिस्तानात राज्य केले. मुशर्रफ यांच्या काळातही एकही पंतप्रधान टिकू शकला नाही. गेल्या तीस वर्षांत पाकिस्तानने डझनभर पंतप्रधान पाहिले आहेत. भ्रष्टाचार आणि राजकीय विरोध हे पाकिस्तानातील या राजकीय अस्थिरतेचे कारण आहे. नेता पुढे गेला तर त्याला खाली खेचण्यात सेना नेहमीच पुढे असते. याच कारणामुळे पाकिस्तानात पंतप्रधान होणे आणि टिकणे कठीण ठरत आहे.
नवाझ शरीफ २०१३ मध्ये तिसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले; परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवल्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. शरीफ यांची हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान खान यांनी २०१८ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र आता त्यांच्यावरही अविश्वास प्रस्ताव आणला गेला. पाकिस्तानचा एक यशस्वी क्रिकेट कर्णधार ते पंतप्रधान अशी इम्रान यांची वाटचाल आहे. पीएम झाल्यानंतर त्यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवरून केंद्र सरकारवर टीकाही केली. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आक्रमक धोरण घेताना पाकिस्तान लष्कराला जेरीस आणले. त्यामुळे इम्रान आणि त्यांचे सरकार नरमले.


अविश्वास ठराव आणला जात असतानाच मलाकंदमधील एका रॅलीदरम्यान संबोधित इम्रान यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले. भारताने नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण राखले आहे. ‘क्वाड’मध्ये त्यांची अमेरिकेसोबत युती आहे. तरी ते तटस्थ असल्याचे सांगतात. निर्बंधांचा सामना करणाऱ्या रशियाकडून भारत तेल आयात करत आहे. कारण भारताचे धोरण आपल्या लोकांची प्राथमिकता जपते, असे इम्रान यांनी म्हटले. या आधीही नववर्षाच्या सुरुवातीला इम्रान खान यांनी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरभराटीसाठी भारताचे कौतुक केले होते आणि गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या धोरणांबाबत गौरवोद्गार काढले होते. भारताचे कौतुक करण्यात इम्रान यांचा नेमका उद्देश कळलेला नाही. त्यांच्या बदललेल्या सुरांचे स्वागतच करायला हवे.

Comments
Add Comment

प्रश्नांचा फास

थोडसं अनुकूल वातावरण मिळालं, की जुनी दुखणी लगेच उसळी मारतात. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचंही

हजार कोटींचा निष्काळजीपणा

अकरा वर्षांपूर्वी मुंबईत मोनोरेल धावू लागली, तेव्हा सगळ्यांनी 'मोना डार्लिंग' म्हणून तिचं मोठं प्रेमभर कौतुक

मराठी साहित्याचा विश्वास

९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड यंदा

महागाईचा जनतेला हादरा

रिटेल इन्फ्लेशन म्हणजे किरकोळ महागाईचा दर गेले नऊ महिने सातत्याने घसरत होता आणि लोकांनाही हायसे वाटले होते. पण

सरन्यायाधीशांचा फटाका!

राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा नेहमीच होत असते. वाहनांच्या माध्यमातून होत असलेले प्रदूषण, पीकं

कसरतीची चौथी फेरी

उरलेसुरले वस्त्रहरण रोखण्यासाठी उबाठा गटाच्या चाललेल्या कसरतींमधला आणखी एक अंक गुरुवारी पार पडला. दोन्ही