नवी दिल्ली : राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या गौरवशाली सागरी इतिहासाचे स्मरण केले. ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त आपण आपल्या गौरवशाली सागरी इतिहासाचे स्मरण करत आहोत. भारताच्या आर्थिक विकासासाठी सागरी क्षेत्राचे महत्त्वही अधोरेखित करत आहोत.
गेल्या ८ वर्षांत आपल्या सागरी क्षेत्राने नवी उंची गाठली आहे आणि व्यापार तसेच व्यावसायिक व्यवहारांना चालना देण्यासाठी योगदान दिले आहे. भारत सरकारने, गेल्या ८ वर्षांमध्ये बंदर आधारित विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, यात बंदर क्षमता वाढवणे आणि विद्यमान प्रणाली अधिक कार्यक्षम बनवणे समाविष्ट आहे. भारतीय उत्पादनांना नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी जलमार्गांचा वापर केला जात आहे. आर्थिक प्रगतीसाठी सागरी क्षेत्राचा लाभ घेत असताना आणि आत्मनिर्भर भारताची उभारणी करत असताना, भारताला ज्या सागरी पर्यावरणाचा आणि विविधतेचा अभिमान वाटतो त्याचे रक्षण करण्यासाठी आपण पुरेशी काळजी घेत आहोत.” असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.