दादरमधील एक फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भूखंड जप्त
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अखेर प्रत्यक्षात कारवाई करत सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्तात जप्त केल्या आहेत. यामध्ये दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावाने अलिबागमध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण ८ प्लॉट ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. यासोबत संजय राऊतांचा दादरमधील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला आहे.
मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती. तसेच संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा जवळपास १०३४ कोटींचा आहे. याच घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. या अंतर्गत प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता याआधी जप्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.
याआधी संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत जोरदार वाद झाल्यानंतर आता थेट शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीने कारवाई केली आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. पत्राचाळ जमीन प्रकरणात १,०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे.
दरम्यान, यावर बोलताना संजय राऊतांनी भाजपावर प्रतिहल्ला चढवला आहे. “कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली. हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत”, असं संजय राऊत म्हणाले.