पुणे : गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावरील जाहीर सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या मुद्द्यावरून मनसेतही अंतर्गत नाराजी निर्माण झाली आहे.
विशेषत: पुण्यातील मुस्लीमबहुल भागांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मनसेच्या नेत्यांमध्ये राज यांच्या भूमिकेविषयी नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाता मतितार्थच समजलेला नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मी त्यांच्यावर किंवा पक्षावर नाराज नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांचे भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळालेच नाही. राजसाहेब म्हणालो होते, मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर तिकडे जाऊन लाऊडस्पीकर्स लावा. ‘भोंगे काढले नाहीत तर’, असा राजसाहेबांचा शब्द होता. त्यामुळे मशिदींवरील भोंगे काढण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यामुळे प्रथम राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे वसंत मोरे यांनी म्हटले.
याशिवाय, वसंत मोरे मशिदींवरील भोंग्यांवरून घेतलेल्या भूमिकेचा मनसेला निवडणुकीत फटका बसू शकतो, असेही सूचित करण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या कार्यकर्त्यांची मशिदींवरील भोंग्यांविषयीची भूमिका वादग्रस्त ठरू शकते. निवडणुकीत त्याचा परिणाम होऊ शकतो. साईनाथ बाबर यांच्या वॉर्डात ७० टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. आम्ही आतापर्यंत त्यांच्यात जाऊन काम करत आलोय. राजसाहेबांची भूमिका चुकीची नाही. पण मला त्याबाबत बोलायचे नाही. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
सध्या रमजानचे दिवस सुरु आहेत. पोलीस लगेच १४९ ची नोटीस देतात. मलाही कालच पोलीस ठाण्यात बोलावून तुम्ही मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात तुम्ही काही भूमिका घेणार आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नेमकी काय भूमिका घ्यायची हेच मला समजले नाही, अशी हतबलता वसंत मोरे यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर साईनाथ बाबर आणि मला प्रभागातील लोकांचे फोन येत आहेत. एक मुस्लीम गट मला येऊन भेटला. राज ठाकरे बोलतात त्याप्रमाणे आपल्या वॉर्डात मशिदींवरील भोंग्याबाबत काही होणार आहे का, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. त्यावर मी असे काहीही होणार नाही, असे त्यांना सांगितले. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या वॉर्डात शांतता कशी राहील, ही माझी जबाबदारी असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याची नाराजी
कल्याण मधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांने नाराजी व्यक्त करीत सोशल मिडियावर भावनिक पोस्ट लिहली केली आहे. येत्या दोन दिवसात या संदर्भात मनसेतील मुस्लीम पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन काय निर्णय घ्यायचा हे ठरविण्यात येणार आहे. मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख हे पक्षाच्या स्थापनेपासूनची सदस्य आहेत. शेख यांनी मनसे प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या? आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. १६ वर्षाचा फ्लॅशबॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आले, असे इरफान शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भावनिक पोस्टविषयी शेख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पक्ष प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारु लागला आहे की, पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? पक्षात नेमके चाललंय काय? २००९ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेतून मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांना मुस्लिम मतदारांनी मतदान केले होते. तर आता मुस्लिम पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल अस सांगितलं आहे.