गडचिरोली : महाविकास आघाडी सरकारला देशातील नागरिकांची कोणतीही चिंता नाही. त्यांना फक्त दारुड्यांची चिंता आहे. ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची चिंता कमी बेवड्यांची जास्त आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. गडचिरोलीत त्यांच्या नेतृत्वात आयोजित जनआक्रोश मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.
सरकारने कोरोना कमी झाल्यानंतर दारूच्या दुकानदारांना मदत केली. दारूवरील ५० टक्के कर कमी केला. विदेशी दारूवरील कर जास्त असल्याचे सांगून तो पन्नास टक्के कमी केला. मात्र, शेतकऱ्यांची वीज माफ केली नाही. असा नालायकपणा या सरकारने केला. तसेच बिल्डर्सचा कर कमी केला. मात्र, शेतकऱ्यांना एका नव्या पैशांची मदत केली नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीत सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला. वेश्यांसाठी दिले जाणारे पैसे त्यांनी आपल्या नातेवाइकांना दिले. वैश्यांच्या पैशांवर या सरकारने डल्ला मारला. असे करणाऱ्यांना काय म्हणतात, ते मी सांगणार नाही. तो शब्द शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना माहिती आहे. ते नेहमी वापरतात, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हाणला.
आमचे मित्र सुधीर मुनगंटीवार नेहमी म्हणतात, महाराष्ट्रात दारुड्यांचं सरकार आले आहे. त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. ते फक्त दारुड्यांची चिंता करतात. त्यांचे म्हणणे बरोबर असल्याचे दिसून येते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारला शेतकऱ्यांना १२५ कोटी रुपये द्यायचे आहेत. मात्र, हे पैसे सुद्धा ते द्यायला तयार नाहीत. धानाचे पैसे फक्त विदर्भातील पाच आणि कोकणातील तीन जिल्ह्यांनाच द्यायचे आहे. हे सुद्धा त्यांना देता येत नाही. मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्ष ४०० कोटींचा भ्रष्टाचार करतो. हे त्यांना चालते. या सरकारने सामान्य माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.