गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
मागील आठवड्यात निर्देशांकात वाढ पाहावयास मिळाली. तसेच सोने या मौल्यवान धातूमध्ये उच्चांकापासून नफा वसुली पाहावयास मिळाली. कच्च्या तेलामध्ये देखील सोन्याप्रमाणे घसरण झाली. तांत्रिक विश्लेषणानुसार चार्टचा विचार करता अल्पमुदतीसाठी सोन्यामध्ये करेक्शन अर्थात तेजीनंतरची तात्पुरती मंदीला सुरुवात झालेली आहे, हे आपण मागील लेखातच सांगितलेले होते. त्यानुसार सोन्यामध्ये हालचाल पाहावयास मिळाली. सध्या अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा तेजीची असून टेक्निकल अॅनालिसिसनुसार तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार कमिन्स इंडिया, सनफार्मा, अदानी पॉवर, आरसीएफ, रेमंड यांसारख्या अनेक शेअर्सची दिशा तेजीची झालेली आहे. मागील आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या तेजीनंतर “सेक्वेंट सायंटिफिक” या शेअरने १४४ ही पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आज १४४.५५ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या शेअरमध्ये योग्य स्टॉपलॉसचा वापर करून गुंतवणूक केल्यास मध्यम मुदतीत चांगला फायदा होऊ शकतो.
मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५७००० आणि निफ्टीची १७००० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर आहे. तोपर्यंत निर्देशांकामधील वाढ कायम राहील. मागील आठवड्याच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, अनेक शुगर कंपन्यांचे शेअर्स हे तेजीचे संकेत देत आहेत. ज्यामध्ये बलरामपूर चीनी, राणा शुगर, उगार शेअर, धामपूर शुगर हे शेअर्स तेजीमध्ये आहेत. त्यामुळे अल्पमुदतीसाठी शुगर सेक्टरकडे पाहता येईल. शेअर बाजारात आणखी तेजी आलीच, तर निफ्टी १७८०० ते १७९०० पर्यंत उसळी घेऊ शकते. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नफा वसुली होऊ शकते. आपण मागील लेखातच कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७१०० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते हे सांगितलेले होते. त्यानंतर एकाच आठवड्यात कच्च्या तेलात आणखी विक्रमी वाढ होत कच्च्या तेलाने ९९९६ हा नवीन उच्चांक नोंदविला. पुढील आठवड्यासाठी मध्यम मुदतीच्या चार्टनुसार कच्च्या तेलाची ७४०० ही खरेदीची पातळी असून जोपर्यंत कच्चे तेल ७००० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत कच्च्या तेलातील तेजी कायम राहील.
अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५२५०० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोन्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. शेअर बाजार हा अत्यंत भावनिक असतो. सकारात्मक किंवा नकारात्मक अशा कोणत्याही घटनेवर बाजार नेहमीच लगेच प्रतिक्रिया देत असतो. निर्देशांकात जर मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्याचा फटका हा नेहमीच अल्प तसेच मध्यम मुदतीसाठी शेअर्सची खरेदी किंवा विक्री करीत असलेल्या गुंतवणूकदारांना बसताना दिसतो. बऱ्याच वेळी शेअर बाजाराच्या घसरणीत घेतलेला शेअर जर खाली आला, तर बहुतेक गुंतवणूकदार हे अल्प तसेच मध्यम मुदतीसाठी घेतलेल्या शेअर्समध्ये स्टॉपलॉसचा वापर करताना दिसत नाहीत. परिणामी होत असलेले नुकसान हे वाढत जाते आणि घेतलेला शेअर कधी तरी पुन्हा वर जाईल, या अपेक्षेने तो शेअर लाँग टर्म म्हणून जतन करून ठेवला जातो. जे गुंतवणूकदार शेअर्स घेतानाच दीर्घमुदतीसाठी म्हणून एखादा शेअर घेतात, त्यावेळी ते टेक्निकल व फंडामेंटल या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घालून शेअरची निवड करत असतात. त्यासोबत पैशाचे योग्य नियोजन करूनच ते गुंतवणूक करीत असतात. शेअर बाजारात दीर्घमुदतीची गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर ठरताना दिसते. पण त्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक होणे आवश्यक असते. आज काही असे शेअर्स आहेत जे दीर्घमुदतीसाठी आकर्षक किंमतीला आलेले आहेत. ज्यामध्ये टाइड वॉटर, टीटीके प्रेस्टीज, फोर्स मोटार, पीजीएचएल, कॅम्स, हडको, ट्रान्सफोर्मर अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड हे शेअर्स आकर्षक किमतीला आहेत.
याशिवाय पुढील दहा वर्षांचा विचार करता “असेट मॅनेजमेंट”मधील एक कंपनी जी आज अत्यंत आकर्षक किमतीला मिळत असून फंडामेंटलदृष्ट्याही चांगली दिसत आहे. “अॅसेट मॅनेजमेंट” या क्षेत्रात क्रमांक दोनची आणि एचडीएफसीसारख्या मोठ्या ग्रुपचा भाग असलेली कंपनी आहे. “एचडीएफसी एएमसी”चे मार्केट कॅपिटल आज जवळपास ४७ हजार करोडचे असून फेस व्हल्यू ५ आहे. ही भारतातील मोठी “अॅसेट मॅनेजमेंट” कंपनी असून यांचे मोठ्या प्रमाणात सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहेत. यांच्या जवळपास २३ इक्विटी संलग्न स्कीम्स आहेत.
या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कंपन्या आणि एकूण कस्टमर यांचा विचार करता एकूण कस्टमरपैकी जवळपास २७ टक्के कस्टमर हे एकट्या “एचडीएफसी एएमसी” या एका कंपनीचे आहेत. मागील काही वर्षांत त्यांच्या रिझर्वमध्येदेखील चांगली वाढ होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे सातत्याने प्रत्येक वर्षी चांगला डिव्हिडंट ही कंपनी देत आहे. टेक्निकल चार्टनुसार या शेअरमध्ये उच्चांकापासून ४० ते ४२ टक्क्यांची घसरण या कंपनीच्या शेअरमध्ये झालेली आहे. त्यामुळे आज २२७६ रुपये किंमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील १० वर्षांचा विचार करता चांगला फायदा होणे अपेक्षित आहे.