सोलापूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी ५ एप्रिल ते १७ मे या काळात राज्यभरात ओबीसी संघर्ष रथयात्रा काढून जनजागृती करण्यात येणार आहे. पाच एप्रिल रोजी सकाळी १०.१० वाजता तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन या रथयात्रेची सुरुवात होणार आहे. १७ मे रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर याचा एल्गार मोर्चाने समारोप होणार असल्याची माहिती ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली. तसेच याप्रश्नी केंद्र व राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा त्यांनी आरोप केला.
बारसकर म्हणाले, देशात ७२ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला आरक्षणासह इतर सुविधा देण्याची शिफारस बी. पी. मंडल आयोगाने केली होती. १९८९ मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंडल आयोगाचा प्रस्ताव मान्य करून ओबीसींना आरक्षण मंजूर केले. तेव्हा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ३१ याचिका दाखल झाल्या. त्या निकाली निघण्यासाठी १९९२ साल उजाडले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसींना ४५ वर्षे आरक्षणासाठी वाट पाहवी लागली. आरक्षण मिळून २५ वर्षे झाली नाहीत तोच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण काढून घेतले आहे. यापुढील काळात शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षण काढून घेतले जाईल, अशी भीतीही बारसकर यांनी व्यक्त केली.
याप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर ते मुंबईतील आझाद मैदानापर्यंत ओबीसी संघर्ष रथयात्रा काढत आहोत. यात राज्यातील ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी उस्माबादचे माळी समाजाचे नेते महादेव माळी, नाभिक समाजाचे नेते लक्ष्मण माने, तेली समाजाचे नेते रवी कोरे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, उद्योजक बाळासाहेब चिकलकर, मारुती रोकडे, ओबीसी सेलचे तुळजापूर तालुकाध्यक्ष विकी घुगे, महेश माळी, महादेव माळी, खलील सय्यद, माजी नगरसेवक अतुल क्षीरसागर, शीलवंत क्षीरसागर, जितेंद्र अष्टुळ, सागर अष्टुळ, उमेश गोटे, सुलतान पटेल, इशान खरकदारी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.