पनवेल (प्रतिनिधी) : आगामी एका वर्षाच्या आत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांच्या हस्ते रविवारी रायगड जिल्ह्यात १३१.८७ कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि ४३० कोटी रुपयांच्या ४२ किलोमीटर मार्गासाठी भूमीपूजनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम एकूण ११ टप्प्यांमध्ये सुरू आहे. सुरुवातीच्या काळात भूमी अधिग्रहण, रेल्वे विभाग आणि वनविभागाच्या परवानग्या यामुळे कामाला उशीर झाल्याचे ते म्हणाले. मुंबई-गोवा ही हृदयवाहिनी आहे. त्यामुळे हे काम नक्कीच एक वर्षाच्या आत पूर्ण करू. हा महामार्ग आता केवळ मुंबई-गोवा नाही, तर पुढे तो मंगलोरपर्यंत नेण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर शासकीय जमीन उपलब्ध झाली, तर लॉजिस्टिक पार्क आणि ट्रक टर्मिनल उभा करण्यास सर्वतोपरी मदत करू, असे गडकरी याप्रसंगी म्हणाले.
कोकणतील युवकांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधीबद्दल गडकरी यांनी सांगितले की, गेल्या सात वर्षांत जेएनपीटीमध्ये एक लाख कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. जेएनपीटीमध्ये २०१६ मध्ये ५७० कोटी रुपये खर्च करून विशेष आर्थिक क्षेत्र सुरू करण्यात आले. त्यात आता २४ कंपन्या आलेल्या आहेत. या माध्यमातून ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक लवकरच येणार आहे. यामुळे कोकणातील दीड लाख युवकांना रोजगार मिळेल.
महाराष्ट्राला विशेषतः कोकणाला गड-किल्ल्यांचा मोठा वारसा लाभला आहे. त्यामुळे राज्यातील किल्ल्यासंदर्भात रोपवेसाठी जेवढे प्रस्ताव येतील तेवढे पूर्ण करू, असे नितीन गडकरी म्हणाले. रोपवेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे ऑस्ट्रियन डॉफलवेअर तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्याचा राज्यात वापर करता येईल. तसेच सर्व किल्ल्यांवर ‘लाइट अँड साऊंड शो’ची व्यवस्था करण्याची त्यांनी सूचना केली.
रविवारी लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये दिघी बंदराला जोडणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. एमएसआरडीसीच्या सहकार्याने १३१.८७ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून माणगाव, मसाळा, दिघीपूर बंदर राष्ट्रीय मार्ग ५४.७५० किमी दुहेरी काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे.