सीमा दाते
आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि मनसेचा शनिवारी झालेला मेळावा हेच सांगतो आहे की, मनसेने मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. २०१९ नंतर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांत मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला नव्हता. मात्र शनिवारी झालेला मेळावा हा ऐतिहासिक होता, असंच म्हणावं लागेल. राज ठाकरे यांनी डागलेली तोफ आणि मेळाव्याला उसळलेली गर्दीही हेच सांगत होती. की, भविष्यात राज ठाकरे आता आपल्याला अॅक्शन मोडमधेच दिसणार आहेत हे नक्कीच.
शनिवारी झालेल्या मेळाव्यात मनसेने महाविकास आघाडीवर टीका केली, विशेष म्हणजे शिवसेनेवर टीका करण्यासाठी राज ठाकरे यांनी एकही वेळ सोडली नाही. मुंबई महापालिकेतील झालेल्या भ्रष्टाचारावरही राज ठाकरे बोलले आहेत. विशेषत: शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी केल्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला की काय? असा प्रश्न अनेकांना पडला. पण त्याच वेळेस मनसेने मात्र हिंदुत्वाच्या बाजूने आपला पक्ष कायम ठेवला आहे. केवळ मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन उदयाला आलेली मनसे आता मात्र हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाताना दिसत आहे.
विशेष म्हणजे आता भाजपचा मुद्दा आणि मनसेचा हिंदुत्वाचा मुद्दा सारखाच झाला आहे. महापालिकेवर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भाजपने जी टीका केली आहे, तेच आरोप राज ठाकरे यांनी केले आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसेचे शत्रू एकच आहेत की काय? असा प्रश्न उभा राहतोय. त्यात काही महिन्यांपूर्वी मनसे आणि भाजपमध्ये अंतर्गत युतीची चर्चा होती आणि हीच अंडरस्टँडिंग मनसेच्या मेळाव्यात पाहायला मिळाली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपच्या छुप्या युतीची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वांपासून शिवेसच्या पक्षप्रमुखांपर्यंत सर्वांवरच टीका केली. मुळात राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे अचूकच आहेत. जे मंत्री तुरुंगात जातात, त्याच पक्षांचे सरकार सुरू आहे असं कसं?, हा तर सामान्यांचा प्रश्न. पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना विचारतंय कोण आणि म्हणूनच या सगळ्यांची आगपाखड शनिवारच्या मेळाव्यात पाहायला मिळाली.
आता प्रश्न राहिला तो आगामी महापालिका निवडणुकीचा, तर या निवडणुकीत भाजप मनसे युती नसली तरी छुपी अंडरस्टँडिंग मात्र असणार आहे. गेल्या निवडणुकीत काहीशा फरकामुळे हातातून निसटलेली मुंबई महानगरपालिका मिळवण्यासाठी भाजपचे अथक प्रयत्न सुरू आहेत. काहीही केल्या भाजपला या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर सत्ता हवी आहे.
सध्याचे मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना – ९९, भाजप – ८३, काँग्रेस – ३०, राष्ट्रवादी – ८, समाजवादी पार्टी – ६, मनसे – १, एमआयएम – २ आहे. तर २०१७च्या निवडणुकीत मनसेतून ६ नगरसेवक गेल्याने शिवसेनेची संख्या वाढली होती. आताच्या महापालिका निवडणुकीत मात्र भाजप एकहाती सत्ता घेण्याच्या तयारीत आहेत. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वबळावर निवडणुक लढायच्या तयारीत असले तरी भाजप आणि मनसे युतीची चर्चा जोरदार सुरू आहे. जरी भाजप मनसे युती झाली नाही, तरी भाजप आणि मनसेमध्ये अंडस्टँडिंग फॉर्म्युला वापरण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या काही मोठे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी झाल्या आहेत. त्यामुळे युती करणार नसेल तरी अंतर्गत एकमेकांना हे दोन्ही पक्ष मदत करतील याची शक्यता आहे. कारण मनसेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या विरोधात आहे, तर भाजपलाही तीन पक्षांच्या विरोधात ही निवडणूक लढावी लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष निवडणूक वेगवेगळे लढले तरी शिवसेनेला महापौर बसवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मदत करणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपच्या हातातून महापौरपद जाऊ नये, म्हणून भाजप अंतर्गत मनसेची मदत घेणार, असे दिसत आहे. तर भाजपला २३६ पैकी १००हून अधिक तरी नगरसेवक निवडणूक आणावे लागणार आहे, तर शिवसेनेचे संख्याबळ ६० ते ८०च्या पुढे जाता कामा नये यासाठी मनसेला सोबत घेऊन भाजपला प्रयत्न करावे लागणार आहे, तर ज्या विभागात शिवसेनेचा उमेदवार मजबूत असेल तिथे मनसेचा उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे मराठी मतांचे विभाजन होईल, तर जिथे भाजपचा मजबूत उमेदवार उभा असेल, तिथे मनसेचा कमी बळ असलेला उमेदवार उभा केला जाईल. एकूणच काय तर मनसेला भाजपची अंतर्गत मदत आणि भाजपला मनसेची, अशा प्रकारे मुंबई महापालिका निवडणुकीची समीकरणं ठरवली जाण्याची शक्यता आहे.
विशेषतः यामुळे मराठी मतांचे विभाजन होऊन शिवसेनेचे संख्याबळ कमी करणे, असा हेतू आहे. दुसरीकडे, भाजप-मनसे मात्र जोरदार तयारीत आहेत. एका बाजूला शिवसेनेच्या आर्थिक कोंडीमुळे शिवसेना हैराण झालेली असताना दुसऱ्या बाजूला मनसे-भाजप तयारीत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.
seemadatte@@gmail.com