नाशिक : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यभरात पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. मुंबईपाठोपाठ आता नाशिकमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे लावून हनुमान चालिसा पठण सुरु केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या भद्रकाली मंदिराच्या परिसरात सोमवारी मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे लावले. नाशिकचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेने ही मोहीम हाती घेतली आहे. इतकंच नाहीतर नाशिकमध्ये ३५ मंदिरांमध्ये भोंगे वाटप करणार असल्याचीही माहिती आहे.
मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा नाहीतर आम्ही लाऊडस्पीकरवर ‘हनुमान चालिसा’ लावू असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या सभेत दिला होता. हा इशारा मनसेने प्रत्यक्षात आणायला सुरुवात झाली आहे. घाटकोपरमध्येही मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर ‘हनुमान चालिसा’ पठण सुरू केलं.
यानंतर आता कल्याण पश्चिमेला साई चौक येथील मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयावर भोंगा लावत मनसे कार्यकर्त्यांनी केलं हनुमान चालिसा पठण केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी जय श्रीराम नारा सुद्धा दिला. देशातील अनेक कोर्टांनी मशिदींवरील अजान ऐकविणारे भोंगे बेकायदेशीर असून ते हटवावे अशा स्वरुपाचे निर्णय दिले आहेत.
भोग्यांमुळे ध्वनीप्रदूषण होते हे पण एक कारण दिले जाते. पण आजही अनेक मशिदींवर भोंगे अर्थात लाऊडस्पीकर आणि स्पीकर कायम आहेत. या भोंग्यांवरून दररोज पाच वेळा अजान ऐकवली जाते. उघडपणे हा बेकायदा प्रकार सुरू आहे. पण या विरोधात अद्याप कारवाई झालेली नाही. या प्रकाराविरोधात मनसे आता आक्रमक झाल्याचे चित्र आहे.