नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताने मदतीचा हात दिला आहे. इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेल्या या देशाला भारताने फेब्रुवारीपासून चार खेपांमध्ये एकूण दीड लाख टन इंधन पाठविले आहे. यामध्ये जेट इंधन, पेट्रोल आणि डिझेल यांचा समावेश आहे, अशी माहिती श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी दिली.
कोरोना काळात पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसल्याने श्रीलंकेला मोठा आर्थिक फटका बसला असून या देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी या देशाने भारताकडे मदतीचा हात मागितल्यानंतर भारताने जानेवारी महिन्यापासून त्यांना सुमारे अडीच अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंचा पुरवठा केला असल्याचे बागले यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. श्रीलंकेला मदत म्हणून ५० कोटी डॉलर कर्ज पुरविण्याबाबत फेब्रुवारीमध्ये दोन देशांमध्ये करार झाला आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत दीड लाख टनांचे इंधन या श्रीलंकेला पुरविण्यात आले आहे. मे महिन्यापर्यंत आणखी पाच खेपांमध्ये मदत पुरविली जाणार आहे. शिवाय, अन्न, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी एक अब्ज डॉलरचे मदतरूपी कर्जही श्रीलंकेला दिले जाणार असल्याचे बागले यांनी सांगितले. या करारानुसार, श्रीलंकेला लवकरच तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे.
आर्थिक संकटातील श्रीलंकेला भारताने ४० कोटी डॉलरचे परकी चलन देण्याची आणि इंधन खरेदीसाठी ५० कोटी डॉलर देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेने घेतलेल्या कर्जाचे हप्तेही भरण्यासाठी सवलत दिली आहे. भारताने अडचणीच्या काळात केलेल्या या मदतीबद्दल श्रीलंकेच्या जनतेकडून आभार व्यक्त होत आहेत, असे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी सांगितले.
श्रीलंकेला मदत करण्याबाबतची चर्चा आणि त्यावर अंमलबजावणी, ही प्रक्रिया काही आठवड्यांमध्येच पूर्ण झाली. श्रीलंकेकडे परकी गंगाजळीचे प्रमाण कमी असल्याने त्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या. अशा वेळी भारताने केलेली मदत श्रीलंकेच्या जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. – गोपाल बागले,भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त