Tuesday, April 29, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

भारताचा १५५ धावांनी विजय

हॅमिल्टन (वृत्तसंस्था) : आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत शनिवारी भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजची विजयी घोडदौड रोखली. सलामीवीर स्मृती मन्धानासह (११९ चेंडूंत १२३ धावा) उपकर्णधार हरमनप्रीत कौरच्या (१०७ चेंडूंत १०९ धावा) शानदार शतकांच्या जोरावर भारताने प्रतिस्पर्ध्यांवर १५५ धावांनी मात केली.

हॅमिल्टनमधील सेडन पार्क स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताच्या क्रिकेटपटूंनी सर्व आघाड्यांवर वर्चस्व गाजवले. स्मृती, हरमनप्रीतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३१७ अशी मोठी धावसंख्या उभारली. भारताचा वर्ल्डकपमधील हा रेकॉर्ड ठरला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या ओपनर्सनी शतकी सलामी दिली तरी प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांनी अचूक मारा केल्याने त्यांचा डाव ४०.३ षटकांत १६२ धावांमध्ये आटोपला. हा सामना जिंकून भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावले.

स्मृती मन्धानाच्या आणि हरमनप्रीर कौरच्या बहारदार खेळीनंतर स्नेह राणा ( ३-२२), मेघना सिंग ( २-२७) आणि झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड व पूजा वस्त्राकर (प्रत्येकी १ विकेट) यांनी आपली कामगिरी चोख बजावली. वेस्ट इंडिजच्या डिएंड्रा डॉटिन (६२ धावा) व हेली मॅथ्यूजने (४३ धावा) झटपट सुरुवात करताना पहिल्या विकेटसाठी १०० धावा जोडल्या. मात्र आघाडी फळी कोसळली आणि भारताने मोठ्या फरकाने विजयाची नोंद केली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताला स्मृतीने यास्तिका भाटियासह ४९ धावांची सलामी दिली. भाटिया ३१ धावांवर बाद झाल्यानंतर भारताच्या तीन विकेट धडाधड पडल्या. कर्णधार मिताली राज (५), दीप्ती शर्मा (१५) हे माघारी परतल्यामुळे भारताची अवस्था ३ बाद ७८ अशी झाली. त्यानंतर स्मृती व हरमनप्रीतने चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची विक्रमी भागीदारी केली. भारताकडून वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वोत्तम भागीदारी ठरली. याआधी पूनम राऊत आणि थिरूष कामिनी यांनी २०१२मध्ये १७५ धावांची केलेली भागीदारी यापूर्वी सर्वाधिक होती. महिला वनडे सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना शतक झळकावणारी हरमनप्रीत कौर ही पहिली भारतीय महिला ठरली. यापूर्वी रूमेली धर हिने २००८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध नाबाद ९२ धावा केल्या होत्या.

स्मृती मन्धानाला प्लेअर ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले; परंतु तिने ही ट्रॉफी हरमनप्रीत कौरसोबत संयुक्तपणे स्वीकारली. आयसीसीने आम्हा दोघींना वेगवेगळ्या ट्रॉफी द्यायला हरकत नाही, असेही ती यावेळी मजेत म्हणाली.

मितालीच्या नावेही विक्रम

भारताची कर्णधार मिताली राज हिच्या नावावरही एक विक्रम झाला. महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये (२४) एखाद्या संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला.

झुलनच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट

महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ४० विकेट घेण्याची ऐतिहासिक कामगिरी झुलन गोस्वामीने नावावर केली आहे. न्यूझीलंडमध्ये झुलनने सर्वाधिक २४ विकेट घेताना नीतू डेव्हिडचा २३ विकेटचा विक्रम मोडला.

Comments
Add Comment