Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीनरेंद्र मोदींना पर्याय निर्माण करायचा असेल तर शरद पवार हवेतच

नरेंद्र मोदींना पर्याय निर्माण करायचा असेल तर शरद पवार हवेतच

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नेतृत्त्व शरद पवार यांच्याकडे देण्यासाठी आग्रही असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्यासमोर पर्याय निर्माण करायचा असेल शरद पवारांचीच गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते सोमवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद द्यावे, असा ठराव नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मंजूर करण्यात आला होता. याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी देशात विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत, आम्ही सर्वच त्यांचा आदर आणि सन्मान करतो. देशातील विरोधी पक्षांना एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र यावेत, यासाठी हालचाली सुरू आहेत आणि शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय या एकजुटीचं पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सर्वांना माहीत आहे. पवार यांचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभत असतं. शरद पवार यांच्या प्रयत्नशिवाय मोदींना पर्याय आणि सक्षम विरोधी पक्ष तयार होऊ शकत नाही,हे माझं स्पष्ट मत आहे. देशामध्ये अनेक मोठे नेते आणि ते नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, या सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांनी पुढे यावे, असे मत संजय राऊत यांनी मांडले.

दरम्यान, शरद पवार यांनी कालच प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्याला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदात रस नसल्याचे स्पष्ट केले होते. यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारण्यात मला रस नाही. मात्र, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे सहकार्य लागेल ते माझ्याकडून केलं जाईल, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -