नागपूर (हिं.स.) : इस्रायलींप्रमाणेच काश्मीर खोऱ्यातून निर्वासित झालेल्या हिंदू बांधवांनी आपल्या मूळ स्थानी परतण्याची वेळ आली आहे. त्यांनी निर्धाराने आपल्या जन्मभूमीत परतले पाहिजे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी केले. जम्मूमध्ये संजीवनी शारदा केंद्राद्वारे ‘त्याग आणि शौर्य दिवस’ साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आयोजित नवरेह समारोहामध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना सरसंघचालक भागवत बोलत होते.
ते म्हणाले, इस्त्रायलचे लोक त्यांच्या मातृभूमितून निर्वासित झाले होते. जगभर विखुरलेल्या या लोकांनी तब्बल १८०० वर्ष आपला संकल्प कायम ठेवला आणि त्यांच्या मातृभूमीत परतले.
या वेळी अशा पद्धतीने स्थायिक व्हा की, तुम्हाला पुन्हा कुणी तुमच्या मातीतून उखडून फेकणार नाही. आयुष्यात अनेक प्रकारची संकटे येत-जात असतात. आपण धैर्य आणि संयमाने त्यावर मात करू शकतो. सध्या स्वतःच्याच देशात विस्थापित होण्याचे दाहक चटके गेली तीन ते चार दशके सोसावे लागत आहेत. परिस्थितीशी दोन-हात करून विजय मिळवणे हा त्यावर उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला संकल्पबद्ध व्हावे लागेल. पुढल्या वर्षीचा नवरोह सण आपल्या जन्मभूमीत साजरा करू, असा निर्धार करण्याची गरज असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान काश्मिरी पंडितांची कथा मांडणारा ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या भयानक शोकांतिकेचे दुर्दैवी वास्तव दाखवले आहे. गेल्या ११ वर्षांत आपल्या सामूहिक प्रयत्नांमुळे कलम ३७० हटवण्यात यश आले आहे. दहशतवादामुळे आपण काश्मीर सोडले. पण आता परत येताना आम्ही हिंदू आणि ‘भारतभक्त’ म्हणूनच आपल्या सुरक्षिततेची आणि उपजीविकेची हमी घेऊन परत जाऊ. इथून पुढे आम्ही आता अशा प्रकारे जगू की कोणीही आम्हाला विस्थापित करण्यास धजावणार नाही, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.