मुंबई : माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. माझी ही राजकीय भेट नव्हती. या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि कौटुंबिक होती, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
गडकरी यांनी रविवारी रात्री राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. उभय नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या भेटीमुळे भाजपा-मनसे युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. त्यावर गडकरी यांनी राज ठाकरेंच्या घरातून निघताना खुलासा केला.
गडकरी पुढे म्हणाले की, राजकीय हेतूने आपण राज ठाकरेंची भेट घेतलेली नव्हती. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचे नवं घरंही पाहायला त्यांनी मला बोलावलं होतं. म्हणून मी आलो होतो. काही दिवसांपूर्वी हृदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला, त्यावेळी राज यांनी म्हटलं होतं, एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल.