माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाहिला ‘द कश्मीर फाइल्स’
कणकवली (प्रतिनिधी) : देशप्रेम काय असते आणि देशाप्रती समर्पित भावना कशा असाव्यात, हे देशाच्या तिन्ही सैन्य दलांतील सैनिकांकडून शिकावे. देशासाठी सर्व काही पणाला लावून प्रत्येक युद्धात लढलेल्या माजी सैनिकांचे योगदान फार मोठे आहे. हे सैनिक देशाची शान तर आहेतच त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचा ते अभिमान आहेत. देशाच्या या खऱ्या संपत्तीचा येणाऱ्या प्रत्येक पिढीने आदर, मानसन्मान ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन भाजप आमदार नितेश राणे यांनी केले.
आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत दाखविण्यात आला. या वेळी १९६५ आणि १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आ. नितेश राणे बोलत होते.
माजी सैनिक कणकवली संघटनेचे अध्यक्ष संतोष ऊर्फ नाना मुसळे, जिल्हा समन्वयक चंद्रशेखर जोशी, पतसंस्था महासंघाचे सचिव धनंजय राऊळ, उपाध्यक्ष धोंडीराम सावंत व नीलेश परब, सचिव दत्तगुरू गावकर, मुख्य सल्लागार रवींद्र पाताडे, दिनकर परब, ऑगस्तीन लोबो, महादेव तावडे, संतोष चव्हाण, मंगेश देसाई, सतिश भोसले, सदानंद सावंत, यांच्यासह माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री युवक जिल्हा सचिव संदीप मेस्त्री, चित्रपट मंदिर व्यवस्थापक राजू मल्हार आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, द कश्मीर फाइल्स चित्रपट माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना दाखविणे यामागील उद्देश त्यावेळी वस्तुस्थिती काय होती व त्यावेळी आपल्या सैनिकांनी काश्मीरमध्ये कसे काम केले होते हे दाखवणे. पण आज खूप परिस्थिती बदलली आहे. सरकार आणि प्रशासन भक्कम असल्याने आज दिसणारी स्थिती आणि पूर्वीची परिस्थिती यातील फरक आपल्याला कळेल. माजी सैनिकांचा आदर करा. आजचा सत्कार हा या माजी सैनिकांच्या ऋणातून उतराई होणासाठी आहे. तुमचा हक्काचा आमदार म्हणून तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी तत्पर आहे. देशाचे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेसाहेब आपल्यासोबत आहेत. सैनिकांचा प्रत्येक प्रश्न आपण मोदी सरकारच्या माध्यमातून सोडवू, असे आश्वासन या वेळी आमदार नितेश राणे यांनी दिले.
‘३७० कलम का हटवले याचा अर्थ कळेल’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३७० कलम का हटवावे लागले, हे कश्मीर फाईल पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला समजेल, असे आमदार नितेश राणे यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक यांना द कश्मीर फाईल्स चित्रपट पाहण्याप्रसंगी सांगितले.