Friday, June 13, 2025

केदारनाथ धामचे दरवाजे ६ मे पासून खुले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधील केदारनाथला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर असून ६ मे पासून केदारनाथ धामचे दरवाजे उघडणार आहेत. यासाठी केदारनाथ हेलिकॉप्टरचे बुकिंगही सोमवार ४ एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे.


गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक प्रवाशांना केदारनाथ सारख्या दूरच्या ठिकाणी जाता आले नाही. मात्र आता प्रवाशांसाठी ही खूशखबर म्हणता येणार आहे. प्रवाशांना केदारनाथ धामला पूर्ण सहजतेने पोहोचता यावे यासाठी सरकारने हेलिकॉप्टरचे बुकिंगही सुरू केले आहे. गुप्तकाशी, सिरसी आणि फाटा येथून केदारनाथ धामपर्यंत हेलिकॉप्टर सेवा बुक करता येऊ शकणार आहे. केदारनाथ धामपर्यंत जाण्यासाठी घरबसल्या ऑनलाईन बुकींगही करता येणार आहे. यासाठी उत्तराखंड सरकारच्या heliservices.uk.gov.in या वेबसाइटला भेट देऊन बुकिंग करावे लागेल.


प्रवाशांची सोय लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने यंदाही हेलिकॉप्टर सेवेच्या भाड्यात वाढ केलेली नाही. २०२० मध्ये निश्चित केलेले भाडे यावेळी लागू करण्यात आले आहे. एकूण ९ हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपन्या प्रवाशांना सुविधा देणार आहेत. गुप्तकाशी ते केदारनाथ ७,७५० रुपये, फाटा ते केदारनाथ ४,७२० रुपये, तर सिरसी ते केदारनाथ ४,६८० रुपये मोजावे लागतील.


नोंदणीसाठी प्रथम heliservices.uk.gov.in वर जावे लागेल. येथे नोंदणीवर क्लिक करून त्यानंतर तुम्हाला जिथून हेलिकॉप्टर सेवा घ्यायची आहे ते ठिकाण निवडून नंतर देय रक्कम भरल्यानंतर तुमची हेली सेवा बुक केली जाईल.


दरम्यान या प्रवासादरम्यान प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी चार धाम यात्रेबाबत प्रवासाच्या सर्व मार्गांवर एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करावी. प्रवासाच्या मार्गावर योग्य अंतरावर वॉटर एटीएम बसवावेत. हॉटेल्सवर दर यादी तयार करावी आणि भेसळीवरही लक्ष द्यावे आणि चार धाम यात्रेकरूंच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी करावा, अशा सूचना मुख्यमंत्री धामी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Comments
Add Comment