मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी प्रविण दरेकर यांची आज मुंबई पोलिसांकडून तीन तास चौकशी झाली. मुंबई पोलिसांनी चौकशी दरम्यान कोणते प्रश्न विचारले? याबाबत प्रविण दरेकर यांनी स्वतः माहिती दिली. जो गुन्हा झाला, त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. बँकेकडून काही लाभ घेतलाय का? असा प्रश्न विचारण्यात आला, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.
आज प्रविण दरेकर स्वतः मुंबई पोलिसांत चौकशीसाठी हजर झाले होते. संस्थेच्या सभासदासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. पहिल्या दिवसापासून सांगतोय, की सहकार्य करायला तयार होतो. आम्ही वारंवार न्यायालयात धाव घेतली. आमची भूमिका पोलिसांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यानुसार माहिती दिली. पण, वारंवार तेच ते प्रश्न विचारण्यात आले. जे विचारले त्याची अत्यंत मुद्देसूद उत्तरे दिली. अनेक नियमबाह्य प्रश्न विचारले. मुंबै बँकेशिवाय राज्यस्तरीय फेडरेशनविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देखील प्रविण दरेकर यांनी केला.
मुंबईच्या पोलिस आयुक्तांचा तपास अधिकाऱ्यांवर दबाव दिसत होता. त्यांना वारंवार फोन येत होते. पण, ते फोन कोणाचे होते माहिती नाही, असा संशय देखील प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. पोलिसांनी फोन काढून घेतल्याच्या वृत्ताचं दरेकरांनी खंडन केलं. तसेच गरज भासल्यास चौकशीसाठी पुन्हा हजर राहीन. सरकारचा पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. ते चौकशीदरम्यान प्रत्येक क्षणी दिसत होतं, असा आरोप देखील दरेकरांनी केला.
प्रविण दरेकर मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून निवडून आले होते. पण, सहकार विभागाने दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी दरेकरांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली.