मुंबई : मागील पाच महिन्यांहून अधिक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनकर्त्यांना मुंबई महापालिकेकडून मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका मुख्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले.
कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आंदोलनामध्ये सहभागी असलेल्यांना पिण्याचे पाणी, शौचालय अशा मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या संदर्भात मुंबई पालिकेकडे वेळोवेळी तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होता. मात्र, तरीदेखील सुविधा देण्यात आल्या नसल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आज सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच कर्मचाऱ्यांनी मुंबई पालिकेसमोर आंदोलन सुरू केले. कर्मचाऱ्यांनी रस्ते जाम केले होते. या पाच महिन्यांच्या काळात तब्बल दीडशे लोकांनी आपले जीवन संपवले आहे. तरी देखील सरकारने यावर निर्णय घेतला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिल्या. आंदोलनस्थळाकडे मुंबई महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. आंदोलनस्थळी शौचालयाची सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. सरकारने इथे काय केलं? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.