बिजिंग (वृत्तसंस्था) : चीनमध्ये कोरोनाचा नवा उपप्रकार आढळल्याने खळबळ माजली आहे. यामुळे एका दिवसात १३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले असून जगाच्या चिंतेमध्ये पुन्हा एकदा भर पडली आहे.
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर माजवला असून लॉकडाउन लावण्याची स्थिती उद्भवल्याचे दिसून येत आहे. दरम्यान एकीकडे अनेक देश कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत असताना चीनने मात्र जगाची चिंता वाढवली आहे.
चीनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा उपप्रकार हा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा असून एका दिवसात चीनमध्ये १३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
शांघाईपासून ७० किमीपेक्षा कमी अंतरावर असलेल्या शहरातील सौम्य लक्षणं असणाऱ्या एका कोरोना रुग्णापासून हा नवा उपपक्रार विकसित झाल्याचा अंदाज आहे. सिक्वेंसिंग डेटा आणि स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे सांगण्यात आले आहे. दरम्यान अहवालात म्हटले आहे की, हा उपप्रकार चीनमधील कोरोना किंवा गिसाई, जिथे जगभरातील शास्त्रज्ञ उत्परिवर्तनांचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी सिक्वेसन्स केलेला कोरोना व्हायरस शेअर करतात त्यांच्याकडे सादर केलेल्या इतर कोरोना व्हायरसशी जुळत नाही.
दरम्यान देशातील स्थिती पुन्हा एकदा नियंत्रणात आणावी यासाठी प्रयत्न सुरू असून, शांघाईमध्ये नेमक्या काय उपाययोजना केल्या जात आहेत हे पाहण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांनी भेट दिली. आर्थिक केंद्र असणाऱ्या शांघाईत सध्या परिस्थिती अनियंत्रित आहेत. सोमवारपासून मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.