Thursday, May 8, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

राज्यात २२ हजार महसूल कर्मचाऱ्यांचा संप

राज्यात २२ हजार महसूल कर्मचाऱ्यांचा संप

मुंबई (प्रतिनिधी) : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील २२ हजार महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम राज्यातील कामकाजावर झाला आहे.


मागील अनेक दिवसांपासून रिक्त पदाची भरती करण्याची मागणी होत आहे, तर ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध होत नसल्याने दोन वर्षांपासून नायब तहसीलदारांना पदोन्नती मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे. महसूल विभागात सहायकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमर्यादेत पार पाडावी. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४३०० वरून ४६०० रुपये करावा. २७ नव्या तालुक्यांमध्ये विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती करताना महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावी. प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे. पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-३ पदावर पदोन्नती द्यावी, या मागण्यांसाठी सोमवारी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूलच्या २२ हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. ज्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात ओस पडलेली दिसून आली.


दरम्यान यापूर्वीही २८ मार्चला महसूल कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण करून देखील शासनाने दखल न घेतल्याने, सोमवारपासून राज्यभर महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संपाचा फटका सर्वसामान्यांना बसला असून, महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले. दरम्यान मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment