Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकौन कहता हैं, मुहब्बतकी ज़ुबाँ होती हैं!

कौन कहता हैं, मुहब्बतकी ज़ुबाँ होती हैं!

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

आपल्या देशात संगीत हा कायमच मनोरंजनाचा एक लोकप्रिय प्रकार होता. लोक सिनेसंगीताचे वेडे होते. सिनेमा पाहून आल्यावरही त्यातली गाणी रेडिओवर ऐकायला मिळत. तोही एक मनस्वी आनंद होता, पण बराचसा एकट्याने किंवा कुटुंबीयासमवेत घ्यायचा!

ऐंशीच्या दशकात मात्र एक काळ असा येऊन गेला की, गझल या प्रकाराने सगळ्या भारतावर जबरदस्त मोहिनी टाकली. या काळात संगीत हा सामुहिक आनंद घेण्याचा उत्सव झाला. जागोजाग गझलांचे कार्यक्रम होत. लोक महागडी तिकिटे काढून तिथे हजेरी लावत आणि सामुदायिकपणे गझलांचा, त्यातील कवितेच्या बारकाव्यांचा, आस्वाद घेत.

तो मोठमोठ्या लाँगप्ले रेकॉर्ड्सचा जमाना होता! ज्यांना परवडायच्या ते अशा रेकॉर्ड्स घेऊन रात्रीच्या शांततेत निवांतपणे ऐकत. ज्यांना हे शक्य नसे ते हॉटेलात जाऊन गझलांचा आनंद घेत. अनेक हॉटेलात संध्याकाळपासून अशा रेकॉर्ड्स लावून ठेवलेल्या असत. तिथे तर लोक खास गझला ऐकायलाही गर्दी करत.

या काळात जगजीत सिंग आणि चित्रा सिंग ही नावे लोकांच्या ओठावर खेळत होती. गुलाम अली भारतात येऊन गेल्यावर तर गझल या प्रकाराला जास्तच महत्त्व आले. मात्र ‘गझल-किंग’ म्हटले जायचे ते पद्मभूषण जगजीत सिंग यांनाच! आजही ‘प्रेमगीत’(१९८१), ‘अर्थ’(१९८२) ‘साथसाथ’(१९८२) हे सिनेमे लोकांच्या लक्षात आहेत ते जगजीतसिंगांच्या गझलांमुळेच! त्यांची प्रत्येक गझल अर्थपूर्ण असायची. कारण त्यांची गायकी बोलप्रधान होती. ते लोकांना सहज समजतील अशाच गझला निवडत. कधीकधी तर हा माणूस गझल सुरू असतानाच, संगीताचा आवाज बारीक करून, अवघड शब्दांचे अर्थ समजावून सांगायचा. कित्येकदा संगीत सुरू ठेवून गंमतीदार किस्से सांगून हसवायचा. श्रोत्यांशी जणू त्यांचा संवाद सुरू असायचा.

त्यांचा कार्यक्रम म्हणजे एक आनंदसोहळा असे. गायक आणि श्रोत्यांत तादात्म्य निर्माण व्हायचे, श्रोते काव्यानंदात आणि संगीतात न्हाऊन निघत. सगळी मैफलच मनाने एकरूप होऊन जायची.

अशीच साहीर होशियारपुरी यांची एक गझल जगजीतसिंग आणि चित्रा सिंग यांनी गायली होती. मात्र हे साहीर लुधियानवी नाहीत. पंजाबच्या होशियारपूरमध्ये जन्मलेले रामप्रकाश शर्मा यांचे शायरीतले टोपणनाव होते ‘साहीर होशियारपुरी’! या कवीने चक्क पर्शियन भाषेत एम.ए. केलेले होते. पहिल्या ओळीत श्रोत्यांच्या मनावर कब्जा करणारे त्यांचे शब्द होते –

‘कौन कहता हैं मुहब्बतकी ज़ुबाँ होती हैं?
ये हक़ीक़त तो निगाहोंसे बयाँ होती है।’

आणि खरेच त्याकाळी प्रेम ही फार नाजूक भावना होती. ती बहुतेक वेळा अव्यक्तच असायची. हल्लीसारखी झटकन आणि स्पष्ट शब्दांत प्रकट होण्याइतकी ती धीट नव्हती. मग सगळा नजरेचाच खेळ. प्रेमाची मुग्ध आणि गूढ भाषा होती नजरेची! नुसते कटाक्ष आणि नेत्रपल्लवीतून सगळे सांगायचे आणि ओळखायचे, समजून घ्यायचे!

प्रत्यक्ष भेटी तरी कुठे व्हायच्या? नुसतेच दुरुन पाहणे, मोनालिसासारखे एखादे संदिग्ध, अर्धवट स्मित किंवा खोटा बहाणा करून हसणे आणि सगळ्यांबरोबर हसताहसता हळूच हव्या त्या व्यक्तीकडे बघून घेणे. तरीही ती गूढ अनावर ओढ मात्र दोन्हींकडून सारखीच असायची!

वर्गात नुसते दिसणे, कुणा कॉमन मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे जाताना तिच्याकडे नुसते पाहणे, तिची वेळ पकडून मिळवलेली रस्त्यातली एखादी चोरटी नजरानजर. बस्स. झाला संवाद! तरीही एखाद्या दिवशी ही नजरभेट झाली नाही, तर मनाची केवढी उलघाल व्हायची! आणि भेट झाली, तो/ती भेटली तरीही मनातली खलीश म्हणजे वेदना, रुखरुख, जास्तच तीव्र व्हायची. कारण किती क्षण ही नजरभेट चालणार हे माहित नसायचे. एक शब्दही बोलता येत नाही म्हणून दोन जिवांची केवढी तगमग! हे सगळे साहीर होशियारपुरी यांनी अगदी हुशारीने केवळ दोन ओळीत मांडले होते –

“वो न आये तो सताती हैं ख़लिशसी दिलको,
वो जो आये तो, ख़लिश और जवाँ होती हैं.”

तिच्या नुसत्या दर्शनाने मन किती प्रसन्न हलकेफुलके, व्हायचे. मनाचे आकाश उजळून निघायचे! मग दिवसभरातील दुसरा कोणताच प्रसंग महत्त्वाचा नसायचा. दिवसभरात पाहिलेले कोणतेच दृश्य इतके झगमगते वाटायचे नाही.

‘रूहको शाद करे, दिलको जो पुरनूर करे,
हर नज़ारेमें ये तनवीर कहाँ होती हैं…’

भावनेला नुसता पूर यायचा, तारुण्यातील प्रेमाचा केवढा अवर्णनीय अनुभव तो! मनात उठलेले ते प्रेमभावनेचे तुफान कसे थांबवणार? त्याला शब्दांतून बाहेर येऊ दिले नाही तरी ते नजरेतून ओसंडून वाहणारच ना! प्रेमिकांच्या डोळ्यांत सगळेच साफ दिसायचे –

“ज़ब्त-ए-सैलाब-ए-मुहब्बतको,
कहाँ तक रोके?
दिलमें जो बात हो, आँखोंसे अयाँ होती है.”

यौवनातल्या अनावर भावना प्रेमिकांना आतून अक्षरश: बेचैन करतात. ‘चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी’ सारखी प्रेमवेडी अवस्था असते ती! त्यामुळेच शायर म्हणतो, जीवन एखाद्या धुमसणाऱ्या चितेसारखे झाले आहे! ती धडाधडा पेटतही नाही किंवा जळून, विझून तिचे रूपांतर धुरातही होत नाही! असे कसे हे यौवनातले जळणे!

“ज़िन्दग़ी एक सुलगती-सी चिता हैं ‘साहिर’
शोला बनती हैं, न ये बुझके धुआँ होती हैं…”

गेले ते दिवस, ती हुरहूर, ते झुरणे, स्वत:शीच हसणे, मनातल्या मनात रडणे. जेव्हा सगळी अभिव्यक्ती स्पष्ट, बटबटीत, भेसूर म्हणावी इतकी थेट झालेली असताना आता फक्त त्या रम्य आठवणींचा नॉस्टॅल्जिया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -