गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
गुढीपाडवा हा हिंदूंचा, मराठी वर्षाचा पहिला दिवस! नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! काल व्हाॅट्सअॅपवर नव्या वर्षाच्या शुभेच्छांत न्हाहून निघाला असाल. आजकाल एकमेकांना ग्रीट करणाऱ्या शब्दांची नाणी इतकी गुळगुळीत झालीय, त्यात सद्भाव दिसत नाही. पेहराव वगळता आपसांतल्या वागण्यात मोकळेपणा दिसत नाही. नाना पाटेकर एकदा म्हणाले होते, “हस्तांदोलन करताना शरीर आणि मनही उत्साही पाहिजे.” जमेल तेव्हा फोनवरील संवाद चालू ठेवा. प्रत्यक्ष बोलताना आपली स्पंदने ऐकू येतात. तो क्षण अविस्मरणीय होतो. जग गतिमान आहे हे खरे आहे तसेच जग खोटेपण आहे. दुसऱ्यांच्या गुणांच्या कौतुकाचे झाड लावायचे असेल, तर ती वेळ आज आत्ता! आजच्या शुभदिनी ते झाड लावा. हीच ‘गुणांची श्रीमंती’!
वसंत ऋतूचे आगमन म्हणजे नववर्षाचा आरंभ. नव्या संकल्पनेची सुरुवात! असाच एक संकल्प - सहलीला गेलेल्या मित्राच्या एका गटाने एका रात्री गप्पा मारताना सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या लििहल्या. प्रत्येकाने एक चिठ्ठी उचलायची आणि चिठ्ठीच्या नावातील त्याचा चांगला गुण किंवा एखादी त्याची चांगली आठवण शेअर करायची. एखादा गट एकत्र येताच उपस्थित नसल्याची निंदा करणे, या वृत्तीला छेद दिला. हीच ‘गुणांची श्रीमंती’!
स्वतःसाठी संकल्प करताना, नवीन काही तरी शिका, नातेसंबंध सुधारण्यासाठी हात पुढे करा. स्वतःच्या मुलांना आपल्या बालपणाच्या आठवणी सांगा. मुलांना बाहेर नेऊन त्याचा अनुभव समृद्ध करा. नवीन पुस्तक वाचा, जिमला जा, पत्र लिहा. यांत्रिक पद्धतीत आयुष्य व्यतीत करताना नववर्षाला शेजारच्यांना बोलवा. एकत्र येण्याने वर्तमान काळातला आनंद विखुरतो.
तुम्ही कार्यक्रम केला नाहीत, तर कुणाच्या लक्षातही येणार नाही; परंतु केलात तर लोक विसरणार नाहीत. आजूबाजूच्या सहकाऱ्यांचे कौतुक करा. शाबासकीचा व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. ओळखीच्या हास्यानेही आपण सारे श्रीमंत होतो, हीच ‘गुणांची श्रीमंती’!
पाठीशी उभा राहून लढ म्हण, याचे उदा. आत्मभान नसलेली, अत्यंत लाजाळू, भाषाही मोडकी-तोडकी अशा नोकरीसाठी आलेल्या मुलीला तिचा प्रयत्न पाहून मॅनेजर म्हणाली, “लीला, तू चांगले काम करतेस की” अशी दाद देऊन तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला. मदर तेरेसा म्हणतात, “ममतेचे शब्द बोलायला छोटे व सोपे असतात पण त्याचे प्रतिध्वनी दीर्घकाळ घुमत राहतात.” हीच ‘गुणांची श्रीमंती’!
डॉ. दत्ता कोहिनकरच्या लेखामधून, “कौतुकाची भूक सर्वांनाच असते. फक्त कौतुक करताना, शाबासकी देताना असत्याचा आधार घेऊ नका. खोटी स्तुती करू नका. त्याऐवजी त्याच्यातील चांगले गुण त्याला दाखवून द्या.”
एक वाचलेली गोष्ट - मला (स्कॉट अॅडमस)लहानपणापासून व्यंगचित्रकार व्हायचं होत. त्यासाठी काय करावं लागतं हे कळत नव्हतं. दूरदर्शनवर व्यंगचित्रावर आधारित सादर करणाऱ्या जॅक कासडीला मी एक पत्र लिहून या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी काय करावं लागेल याविषयी सल्ला विचारला. काही दिवसांनंतर धीर देणाऱ्या पत्रात जॅक यांनी महत्त्वाचा सल्ला दिला, “या क्षेत्रात प्रथम तुला नकाराचा सामना करावा लागेल, खचून न जाता धीराने वाटचाल करीत राहावंस. तू पाठविलेले नमुने छापण्यायोग्य आहेत.” तरीही नकार न पचविता आल्याने व्यंगचित्र काढणे स्कॉटने सोडून दिले. वर्षानंतर पुन्हा जॅकचे पाठिंब्याचे, धिराच्या शब्दाचे पत्र आले, “प्रयत्न चालू ठेव. यश कधीतरी येईलच” पोस्टाच्या एका तिकिटामुळे, त्या धिराच्या शब्दांमुळे नंतर व्यंगचित्रात स्कॉट (डिलबर्ट या नावाने) खूप यशस्वी झाले. हीच ‘गुणांची श्रीमंती’!
चांगले व्हा! चांगल्या माणसांची दोन ठळक लक्षणे म्हणजे नम्रता आणि सहकार्याची जाणीव. दिवाकर गंधेच्या ‘असंच एक चांदण्यांचं झाड’ या लेखातील उदा. - वि. वा. शिरवाडकरांना (कुसुमाग्रज) एका अवघड वळणावर वि. स. खांडेकर भेटले. खांडेकरांनी स्वतःची पदरमोड करून त्या प्रतिभाशाली तरुण कवीचा (कुसुमाग्रज) कविता संग्रह “विशाखा” प्रकाशित केला आणि प्रस्तावनाही लििहली. तसेच रणजित देसाई माधवराव पेशव्यांवर कादंबरी लिहीत आहेत, हे कळल्यावर खांडेकरांनी स्वतः लिखाणासाठी जमवलेली सगळी टिपणं देसाईंना देऊन वर आशीर्वाद दिला “तुझ्या हातून अशी कादंबरी (स्वामी) लिहून होवो की, लोक ‘ययाती’ला विसरतील. हीच ‘गुणांची श्रीमंती’!
जेआरडी टाटांवरील, अशोक पाध्येंच्या पुस्तकातील उदा. - जेआरडी टाटा हे पहिले भारतीय वैमानिक होते. ‘आगाखान ट्रॉफीत जो कोणी भारतीय नागरिक लंडन ते कराची आणि कराची ते लंडन हे अंतर कमीत कमी वेळात एकट्याने विमानाने कापून दाखवेल, त्याला ट्रॉफी मिळणार.’ इजिप्तच्या धावपट्टीवर टाटांना अॅस्पी इंजिनीअर हा दुसरा स्पर्धक भेटला. त्याच्याकडील स्पार्क प्लग खराब झाल्याने, टाटांनी स्वतःकडील जादा स्पार्क प्लग खिलाडूपणे त्याला दिले. अॅस्पी दोन तासांत कराचीला पोहोचून त्याने स्पर्धा जिंकली. अॅस्पी जिंकल्याचा फायदा नंतर त्यांना भारतीय वायुदलात प्रवेश मिळविताना झाला. कर्तृत्वाने एकेक पायऱ्या चढत ते अॅस्पी इंजिनीअर भारतीय वायुदलाचे प्रमुखपद पटकावणारे दुसरे भारतीय ठरले. शाबासकीची थाप, सहकार्य दुसऱ्यांच्या जीवनाला नक्षत्राचे तोरण बांधत असते. हीच ‘गुणांची श्रीमंती’!
गुढीपाडवा! नवा आरंभ! नवी सुरुवात! नवा संकल्प! वसंत ऋतूत झाडाला नवी पालवी फुटते. नवजीवन म्हणजे अंकुर फुटणे. लोकांच्या जीवनात नववर्षाला नवजीवनाची गुढी उभारू या. सत्याला धरून कौतुकाचे शब्द बोलायचे संकल्प करू या. प्रशंसा करताना ‘पण’चा उपयोग करू नका. लोकांसाठी “दाद, कौतुक, आशीर्वाद, मार्गदर्शन आणि शाबासकी” या गुणांचे तोरण आपल्या गुढीला बांधूया. या गुणांचे अनेक दाखले आहेत. आपल्याला जमेल तेवढे दुसऱ्याला लिफ्ट देऊ या, जमेल त्याप्रमाणे भेटणाऱ्याची वाट प्रकाशित करू या.
“स्वतः श्रीमंत व्हा; दुसऱ्याला श्रीमंत करा, अशी ही गुढीपाडव्याची ‘गुणांची श्रीमंती’...!”
[email protected]