क्राइम : अॅड. रिया करंजकर
सामान्य माणसांपासून ते असामान्य माणसांपर्यंत सर्वांचे एकच स्वप्न असतं ते म्हणजे स्वतःच्या हक्काचे घर. घराचं स्वप्न पूर्ण करताना माणसं कर्जाच्या रूपात पैसा उभा करतात व आपलं स्वप्न पूर्ण करतात. हे स्वप्न पूर्ण करताना काहींचे व्यवहार व्यवस्थित पूर्ण होतात, तर काही व्यवहार फसले जातात. ज्यांचे व्यवहार फसतात, त्यांचे घराचे स्वप्नही अपूर्ण राहतं. हे व्यवहार करताना कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता केली नसेल, तर अनेकजण फसतात.
सुरेश हा अंधेरी येथील चकालामध्ये भाडोत्री म्हणून राहायला होता. रामराव हे त्याचे घरमालक होते. घर हे चाळीत असल्यामुळे दुमजली होतं. खालील खोलीत घरमालक रामराव राहत होते व वरील मजल्यावर भाडोत्री सुरेश आपल्या कुटुंबासोबत राहायला होता. गेली तीन वर्ष तो त्यांच्या खोलीत राहत होता. मालक आणि भाडोत्री यांचे संबंध चांगले होते. रामराव यांना पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांनी आपली रूम विकण्याचा विचार केला. ही गोष्ट सुरेशला कळाल्यावर सुरेश म्हणाला की, एवढी वर्ष मी तुमच्या घरात राहत आहे. त्यामुळे तुम्ही मलाच घर विकत द्या. काय रक्कम असेल, मी तुम्हाला देतो. रामराव यांची सुरेश चांगले संबंध असल्यामुळे तेही त्याला घर विकायला तयार झाले आणि साडेसात लाख रुपये किंमत ठरली. सुरेश आणि रामराव आणि काही मंडळी समोरासमोर बसून त्यांनी कागदपत्रे तयार केली व ती कागदपत्रे रजिस्टर नोटरी करण्यात आली. सुरेशने काही रक्कम कॅशने व काही रक्कम बँकेतून रामराव यांना देत व्यवहार पूर्ण केला. दोन्हीही रूम सुरेश यांनी विकत घेतल्या. सुरेशला घर विकल्यावर रामराव दुसरीकडे राहायला गेले आणि काही वर्षांतच रामराव यांचा मृत्यू झाला. अंधेरीसारख्या एरियामध्ये घर असल्यामुळे आताच्या काळामध्ये त्याची किंमत वाढल्यामुळे रामराव यांचा मुलगा सुरेश यांच्याकडे आपले घर परत मागण्यासाठी आला. सुरेश यांनी सांगितलं की, “तुझ्या वडिलांनी मला घर विकलेले आहे.” तो त्यांना उलट बोलायला लागला व शिवीगाळ करू लागला, “मला त्यातलं काही माहित नाही. माझ्या वडिलांनी तुम्हाला हेवी डिपॉझिटमध्ये घर राहायला दिलेलं होतं. आता ते वारले आहेत. त्यामुळे तुम्ही घर खाली करा.” त्यावेळी सुरेश यांनी विकत घेतलेले कागदपत्र त्यांना दाखवले तरी तो ऐकायला तयार नव्हता आणि पंधरा दिवसांची मुदत देऊन तो निघून गेला. पोलिसांमध्ये कंप्लेंट करण्यात आली. पण पोलिसांनी आपापसांत मिटवा, असं सांगितलं. कोणी तिकडे लक्ष देईना. पंधरा दिवसांनंतर रामराव यांचा मुलगा परत आला आणि सुरेशच्या घरातले सामान जबरदस्तीने बाहेर फेकू लागला. “माझं घर आहे आणि ते आता खाली करा”, असं तो त्यांच्याशी भांडण करू लागला. त्यावेळी सुरेशने पोलिसांना फोन केला. पोलीस आल्यावर तो तिथून निघून गेला आणि मी परत येणार, असं सांगून पुन्हा तो आला व तो बोलू लागला की, “माझ्या वडिलांनी असं कोणतं अॅग्रिमेंट केलेले नव्हते. माझ्या वडिलांची तुम्ही खोटी सही घेतलेली आहे”, असे म्हणून त्याने परत वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे सुरेश यांनी असं ठरवलं की, मी रूम तर विकत घेतलेला आहे. कागदपत्रं बनवलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कायदेशीर मार्गाने जाण्याचा विचार केला आणि सुरेश यांनी कोर्टामध्ये संपत्तीचा ताबा मिळण्यासाठी दावा दाखल केला आहे. तो न्यायालयामध्ये प्रलंबित आहे.
रामराव यांनी सुरेशला घर विकलेले असतानाही त्यांच्या मुलाला याची कल्पना असूनही त्या एरियामध्ये भाव वाढलेले आहेत. याच्यामुळे रामराव यांच्या मुलाची नियत फिरली आणि रामराव गेल्यानंतर तो जबरदस्तीने ती रूम परत मिळावी, म्हणून प्रयत्न करू लागला आहे व त्या सध्या मालक असलेल्या सुरेश यांना तो त्रास द्यायला लागला आहे.
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत.)