
मनोरंजन : सुनील सकपाळ
प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांची मध्यवर्ती भूमिका असलेली आणि दोन पिढ्यांमधील वैचारिक तफावत स्पष्ट करणारी ‘भाग्य दिले तू मला’ ही नवी मालिका ४ एप्रिलपासून कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. निवेदिता यांच्यासोबत विवेक सांगळे, तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेकर प्रमुख भूमिकेत आहेत.
एखादी गोष्ट मुळाशी जोडलेली नसेल, तर ती कशी बहरेल, असे म्हणतात. यावरूनच आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला सांगत असतात. आजच्या वेगवान आयुष्यात सगळ्याचाचं विसर पडला आहे, पण यामध्ये आपल्या संस्कृतीला, परंपरेला विसरून कसं चालेल? आपल्याला कितीही नाविन्याची ओढ लागली तरीसुद्धा मुळाशी, परंपरेशी जोडून राहिलेली माणसंचं आपली स्वप्न पूर्ण करू शकतात; परंतु या बदलत्या काळामध्ये आकाशाला गवसणी घालण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी आपण विसरून जातो की, आधुनिक पोकळ झगमगाटापेक्षा सुसंस्कृत दीपोत्सवच प्रगल्भ असतो. संस्कृतीला आणि परंपरेला धरून राहणाऱ्या व्यक्तिला वेडे ठरवणाऱ्या या जगात जेव्हा एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी, तर दुसरीकडे नावीन्याची कास असणारा राजवर्धन जेव्हा एकेमकांसमोर येतात तेव्हा काय घडेल? या दोघांमध्ये हळुवार प्रेम कसे फुलेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या नव्या मालिकेच्या माध्यमातून मिळतील.
‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत निवेदिता जोशी-सराफ या रत्नमालाची भूमिका साकारत आहेत. तीन पात्रांभोवती फिरणाऱ्या कथानकात “रत्नमाला” या पात्राचे स्वत:चे ठाम मत, विचार आहेत. खूपच वेगळी भूमिका आहे आणि म्हणूनच मी मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला. रत्नमालाने स्व:बळावर स्वत:चे विश्व निर्माण केले आहे. परंपरा, संस्कृतीला घट्ट धरूनच तिने इथवरची वाटचाल आपल्या केली आहे; परंतु याउलट तिचा मुलगा राजवर्धन आहे आणि इथेच दोन पिढींमधील विचारांमध्ये खटके उडत आहेत. एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहेच पण दोघेही आपल्यापल्या मतांवर ठाम आहेत. या सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट, संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो आणि म्हणूनच रत्नमालाला अशी मुलगी घरात सून म्हणून हवी आहे, जी तिचंच प्रतिबिंब आहे. जिच्या मदतीने ती आपल्या मुलाला सुधारू शकेल. कारण आज आपण प्रत्येक घरामध्ये हेच घडताना पाहतो. यावर एकच म्हणणं आहे, जुन्या लोकांचा अनुभव घ्या आणि पुढे जा. पण आताच्या मुलांना हे पटत नाही. ही दोन पिढ्यांमधील वैचारिक तफावत आहे, ती या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.
मालिकेचे कथानक प्रेक्षकांना नक्कीच आपलंस वाटेल, असे निवेदिता यांनी सांगितले. गुहागर येथे लहानाची मोठी झालेली कावेरी भाग्यशाली, असं म्हणायला हरकत नाही. कारण सावत्र आईचा दुस्वास तिला कधीच सहन करावा लागला नाही. मुळातच सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या आणि त्यांना अविभाज्य भाग मानणाऱ्या कावेरीचे मन कधीच सिमेंट-काँक्रीटच्या घरात लागलं नाही, तर दुसरीकडे, परंपरा आणि संस्कृती यांना जळमटासारखं झटकून पुढे चालणारा, आताच्या भौतिक सुखांपुढे नाती, प्रेम यांना तुच्छ लेखणारा उद्दाम, मग्रूर, आणि मुळांशी न जोडलेला राजवर्धन म्हणजेच रत्नमाला यांचा मुलगा. ज्याचे म्हणणं आहे, मोठं व्हायचं असेल, तर जमीन सोडावी लागते.
तसेच परंपरेची कास कधीच न सोडलेल्या, त्याचा अभिमान असलेल्या रत्नमाला यांचे खूप मोठे प्रस्थ आहे, मोठ्या उद्योजिका आहेत... ज्यांचा विश्वास आहे की, जमिनीवर राहूनदेखील आकाशापर्यंत गवसणी घालता येते. रत्नमाला या त्यांचा उद्योगाचा डोलारा यशस्वीरीत्या पुढे घेऊन जाण्यासाठी, राजवर्धनमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्यासारख्याच संस्कृतीला धरून चालणाऱ्या मुलीच्या शोधात आहेत आणि याच दरम्यान त्यांची आणि कावेरीची भेट होते. आता रत्नमाला यांच्या पुढाकाराने कसे राजवर्धन आणि कावेरी एकेमकांना भेटणार? कसा असेल त्यांचा हा प्रवास? कशी रंगणार कावेरी आणि राजवर्धनची हळुवार प्रेमाची गोड गोष्ट लवकरच कळेल. विराट एंटरटेनमेंट निर्मित या मालिकेच्या निर्मात्या कश्मिरा पाठारे आहेत.