Tuesday, March 18, 2025

तळ मनाचा

स्वयंसिद्धा : प्रियानी पाटील

पाण्याचे झरे आटू लागले तरी खळाळणारी मनं मात्र विहिरीच्या पाणवठ्यावर नकळत मोकळी होऊ लागतात. पाणी न्यायला येणाऱ्या मैत्रिणींच्या नकळतच गप्पा रंगू लागतात. गप्पाटप्पांतूनच मोकळ्या मनाचा तळ गाठतात.

एकीकडे वसंत ऋतू हिरव्यागार पालवीने जगण्याची उमेद वाढवतो, तर दुसरीकडे पाण्याचा डोह खोल खोल तळ गाठताना दिसतो. या डोहाला आस लागते पावसाची. उन्हाची तिरीप सहन होईनाशी होते. घामाच्या धारा वाहू लागतात. डोळ्यांना उन्हाचा दाह सहन होईनासा होतो. हे असे निसर्गाचे विरोधी चित्र मनाला उमगेनासे होऊन जाते. इतक्या तळपणाऱ्या सूर्याच्या दाहामध्ये झाडांना जगण्याची उमेद कुठून येते. माणसं का हतबल होऊन जातात? विहिरी का आटतात? तलावं का निस्तेज होतात, डोह का तळ गाठतात? यावर पाऊस हाच एकमेव पर्याय होऊन जातो.

पावसाच्या प्रतीक्षेत जसा डोह, विहिरी, तलावं असतात तशीच माणसेही प्रतीक्षेत राहतात. डोक्यावर पदर आणि पाण्याचा हंडा घेऊन भर उन्हातून रस्ता चालणारी महिला पाहिली की, हे चित्र वास्तवाचे रंग म्हणून कुणी रेखाटेल. व्हॉट्सअॅप, सोशल मीडियावर तरळेल. जेव्हा मार्च संपण्याच्या वाटेवर असतो तसं ग्रामीण भागात विहिरीतील झरे आटू लागतात. पाणी तळ गाठू लागतं. तरीही विहिरीवर भांड्यांचे आवाज घुमू लागतात. लाल मातीची पायवाट अधिक उजळू लागते. पाण्याचे झरे आटू लागले तरी खळाळणारी मनं मात्र विहिरीच्या पाणवठ्यावर नकळत मोकळी होऊ लागतात. पाणी न्यायला येणाऱ्या मैत्रिणींच्या नकळतच गप्पा रंगू लागतात. खरं तर पाण्यासाठी वणवण असते. काही ठिकाणी पण ही वणवण काही वेळा मैत्रीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपते. पाणी नेण्याच्या निमित्ताने भेटणाऱ्या मैत्रिणी गप्पाटप्पांतून मोकळ्या मनाचा तळ गाठतात. इथे पाण्यासाठी होणारे कष्ट जरी असले, पाण्यासाठी उन्हात होणारी तगमग जरी असली तरी मोकळ्या मनाचे पैलू उलगडतात. अनेक दिवसांनी सगळ्या महिला एकत्र येतात. कुणी माहेरी आलेलं असतं, त्यानिमित्ताने विहिरी पाणवठ्यावर येणं होतं. मैत्रीचे बंध नव्याने खुलू लागतात.

यामध्ये सासुरवाशिणींच्या गप्पांचं एक गुपित असतं. गप्पांमध्ये गुदमरलेले श्वास मोकळे होऊन जातात. हितगुज साधले जाते. गृहिणींना कधी सुट्टी नसते. काम करताना ती इतकी दमून गेलेली असते की, तिला आरामाची गरज असते, पण ग्रामीण भागात जिथे पाणीटंचाई असते, तिथे तिला रोज पाणी आणण्याचे अधिक काम लागते. त्यात उन्हाळा आणि होणारी तगमग, घामाच्या धारा, त्रस्तता, पुन्हा घरात जाऊन काम अशा गोष्टी असल्या तरी पाणवठ्यावर मनं रमतात तेव्हा या मिळणाऱ्या क्षणिक गप्पांच्या आनंदाने ती काहीशी मनाने ताजीतवानी होऊन जाते.

कष्टाने ती खंगलेली असते, हितगुज साधायला माहेर जवळ नसते. अनेकदा पाणवठ्यावर पाणी भरण्यासाठी येणारी ती पाण्याच्या तळाशी जाऊन घागर भरण्याचा प्रयत्न करते, मात्र पाण्याचा खडखडाट असल्याने अर्धवट घागर कडेवर घेऊन तिला दु:खी-कष्टी मनाने परतावे लागते.

आस लागते ती पावसाची. ओंजळभर पाण्यासाठीही अनेकांना वणवण करावी लागते. अलीकडे काहीसं चित्र बदललं असलं तरी निसर्ग आपल्यापरीनेच वागतो. उन्हाची झळ ही जाणवणारच, पाण्याच्या टंचाईच्या झळा बसतातच. ग्रामीण भागात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेच.

निवडणुकांदरम्यान मतं मागायला आल्यावर प्रत्येकीच्या चेहऱ्यावर पाण्याचं प्रश्नचिन्ह असतं, पण ते कोणत्याही उमेदवाराला कधीच दिसत नाही. पाणीटंचाईच्या काळात विकत पाणी घेण्याशिवाय मग कोणताच पर्यायदेखील उरत नाही. कारण विहिरी आटल्या की, विहिरीवर जाऊनही मग काही उपयोग नसतो. उन्हाची झळही उन्हाळ्यात सर्वात अधिक गृहिणींना बसते. कारण प्रश्न पाण्याचा असतो. शहरात तेवढी पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही, जेवढी ग्रामीण भागात पाणीटंचाई असते.

रस्ते उन्हाने रखरखीत होतात. तहानेने अनेक जीव व्याकुळ होतात. पाण्यासाठी जीव कासावीस होतात. जमिनीतील तण सुकल्याने ते काटेदार बनून अनवाणी पायांना टोचू लागतात. हवेतील गारवा संपून उन्हाच्या वाफा नकोशा वाटू लागतात. ग्रामीण भागातील ही अवस्था दुर्लक्षून चालणारी नाही. कारण कुठे आहे पाणीटंचाई म्हटली तरी ज्याच्या घरी घागर रिकामी त्याला पाण्यासाठी तगमग करावीच लागते. पाण्यासाठी घरातील गृहिणीला उन्हातून बाहेर पडावेच लागते. तिच्या चेहऱ्यावर जरी त्रस्तता दिसून आली नाही, तरी कधी संपणार ही पाण्याचा वनवास, कधी भरणार डोह, कधी येणार हा पाऊस, कधी संपणार हे कष्ट याचा विचार ती अंतर्मनात करतच असते. कारण, ती वरवर हास्याने उमललेली दिसत असली तरी तिच्या मनाचा तळ हा कुणालाच उमगणारा नसतो.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -