मुंबई : कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर ज्याच्या नावाची चर्चा होती तो पंच प्रभाकर साईल याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर हा गोसावीचा बॉडीगार्ड आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवर ड्रग्ज सापडल्यामुळे गेल्या वर्षी हा विषय चर्चेत होता.
आज सकाळी प्रभाकर साईलचा मृत्यू झाल्यानं या प्रकरणात आता खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्याच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं सांगण्यात येत आहे.
प्रभाकर हा किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड होता. इतकंच नाहीतर त्याच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्थादेखील किरण गोसावी यांच्याकडेच होती. बॉलिवूड स्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला सोडवण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोपही प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता.