मुंबई : दोन वर्षांनंतर मनसेचा गुढी पाडवा मेळावा यंदा उत्साहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर चौफेर फटकेबाजी केली. मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचे मग चर्चा चार भिंतीत का केली? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. तसेच मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार” असा सवाल देखील त्यांनी विचारला.
मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा चार भिंतीत का?
“जसा लॉकडाऊन विस्मरणात गेला तशा अनेक गोष्टी तुमच्या विस्मरणात गेल्या. दोन वर्षांपूर्वीच्या घटनाही आपण विसरुन गेलो. २०१९ साली झालेली विधानसभेची निवडणूकही आपण विसरलो. भाजप-शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेस अशी निवडणूक होती. पण निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला की, मुख्यमंत्रीपदाची अडीच-अडीच वर्षे ठरली होती. पण महाराष्ट्रात प्रचार सभा झाल्या तेव्हा कधी ते बोलले नाहीत. मोदींसोबतच्या सभेत तुम्ही फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं बोलला होता. अमित शहा देखील म्हणाले मुख्यमंत्री भाजपचा होईल, तेव्हाही उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत. निकाल लागल्यानंतर मात्र त्यांनी टुम काढली, मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेलाच हवे. मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं आहे मग ही गोष्ट तुम्ही चार भिंतींमध्ये का केली? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
या निवडणुकीतील तीन नंबरचा पक्ष, एक आणि दोन नंबरला फिरवतोय. महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता? आधी शिव्या देतात आणि नंतर एकमेकांच्या मांडीवर बसतात. कारण सांगतात अडीच वर्षांचं तुमचं आतलं झेंगाट, याचा आमच्याशी काय संबंध. ज्या मतदारांनी मतदान केलं ते युती म्हणून केलं, शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी केलं नव्हतं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार” असा सवाल देखील त्यांनी विचारला.
“मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष कधी ठरलं?”
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्ष कधी ठरलं असा जाब विचारत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करून मतदारांशी गद्दारी केल्याचा आरोप केला. तसेच मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना काय शासन देणार? असा प्रश्न विचारला.
राज ठाकरे म्हणाले, “करोना काळात पोलिसांनी जे काम केलं त्यांचे धन्यवाद. त्यांनी करोना होईल याची पर्वा केली नाही. जसा लॉकडाऊन विस्मरणात गेला, तशा अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. दोन वर्षातले आपण विसरलो, तसे दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटना पण आपण विसरलो. २०१९ ला झालेली विधानसभा निवडणूकही विसरलात. तुम्ही जे विसरता ते त्यांच्या फायद्याचं ठरतं.”
“निकाल लागल्यानंतर खास करून उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. ते म्हणाले अडीच अडीच वर्षे ठरली होती. मग महाराष्ट्रात सभा झाल्या तेव्हा ते कधी बोलले का नाहीत. इथे मुंबईत मोदी यांची सभा झाली तेव्हा व्यासपीठावर होतात तेव्हा बोलला नाहीत. मोदी-शहा हे दोघे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. तेव्हा हे का बोलले नाहीत?”
“जेव्हा निकाल लागला तेव्हा सरकार आपल्यामुळे अडचणीत येऊ शकतं हे लक्षात आलं. तेव्हा अडीच वर्षाचा विषय काढला” असं म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगावर हल्ला चढवला.
पळून कुणासोबत गेले? लग्न कुणाबरोबर केलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल करत त्यांच्या पहाटेच्या त्या शपथविधीवरून राज ठाकरे यांनी टीका केली. “मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री…” असे म्हणत अजित पवार यांची नक्कल करत त्यांच्यावर देखील टीका केली. ते पुढे म्हणाले की “एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच, सालं पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं हेच समजेना,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
“मुख्यमंत्र्यांकडे घर कोणत्या आमदाराने मागितलं होतं”?
“आमदारांना मुंबईत घरं द्या आणि त्यांची फार्महाऊस आपल्या नावावर करून घ्या, असं राज ठाकरे म्हणाले. आमच्या आमदाराने सर्वात आधी त्यांना विरोध केला. आमदारांना मिळणाऱ्या पेंशनलाही त्यांनी विरोध केला. ते लोकांसाठी काम करत आहेत, उपकार करत नाही, तसेच मुख्यमंत्र्यांकडे घर कोणत्या आमदाराने मागितलं होतं” असं राज ठाकरे म्हणाले.
हिंदू म्हणून आपण कधी एक होणार?
“राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. १९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलेलो आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार,” असा सवाल राज ठाकरेंनी केला.