मुंबई : सध्या राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत असून अनेक जिल्ह्यांत तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच राज्यातील काही भागांत गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणात उष्णतेची लाट आली होती. तापमान अचानक वाढले होते. तसेच मुंबईत देखील तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत होता. पण, आता कोकणवासियांना आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. येत्या ५ आणि ६ एप्रिलला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राजस्थानसह काही राज्यांमधील लाटसदृश्य वातावरणामुळे गेल्या २९ मार्चपासून विदर्भातील तापमान ४२ अंशावर गेलं असून उष्णतेची लाट आहे. तसेच आज २ एप्रिल आणि उद्या ३ एप्रिलला विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. अकोला, नागपूर आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोकांना उन्हाचे सर्वाधिक चटके जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. नागरिकांनी उन्हात बाहेर पडणं टाळावं. महत्वाचं काम असेल तर उन्हापासून स्वतःचा बचाव करून प्रवास करावा. तसेच भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होईल. अशा सूचना हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आल्या होत्या.